Wardha News : मालमत्ता कर, तुडूंब कारागृह, कृत्रिम पाणी टंचाई ते राजकारण; गांधींच्या वर्ध्यात नेमकं चाललंय काय?

Last Updated:

Wardha News : राजकारण, वाढती गुन्हेगारी, कृत्रिम पाणी टंचाई अशा एक ना अनेक कारणांमुळे जिल्ह्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गांधीच्या वर्ध्यात नेमकं चाललंय काय?
गांधीच्या वर्ध्यात नेमकं चाललंय काय?
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 26 ऑगस्ट : नगर पालिका क्षेत्रात मालमत्ता करात झालेली वाढ, क्राईमचा वाढलेला रेट कमी करण्यासाठी गुन्हेगारांवर होणारी कारवाई व त्यामुळं कारागृहात वाढलेली कैद्यांची संख्या, शासनाचा सुविधा देण्यावर असलेला भर मात्र योजनांना खिळ बसविणारे कामचुकार डॉक्टर आणि नियोजनाचा अभाव असल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणारे जीवन प्राधिकरण चांगलेच चर्चेत आलेत. त्यामुळं सद्या जिल्ह्यात नेमकं चाललं तरी काय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
advertisement
नगर पालिका हद्दीतील नवीन कर आकारणीचा मुद्धा ऐरणीवर
वर्धा : प्रस्थापित कर आकारणीत वाढ केल्याच्या घटनेतून वर्धा शहरासह सिंदी (रेल्वे), हिंगणघाट नगर पालिका हद्दीतील मालमत्ताधारकांवर झालेल्या अन्यायामुळे नवीन कर आकारणी रद्द करून नव्याने करावी या मागणीला घेऊन राजकीय पक्षासह सामाजिक संघटनाही पुढे येऊ लागल्या आहे. सिंदी रेल्वे इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदीले यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेवर धडक देण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. हिच परिस्थिती वर्ध्यातही आहे. वर्धा सोशल फोरमच्या वतीने डॉ. अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिका मुख्याधिकारी राजेश भगत यांची भेट घेत मागणीच निवेदन देण्यात आलं. लवकर निर्णय घेण्यात यावा नाहीतर जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला. काही असो शेवटी सामान्य नागरिकांच्या मुद्ध्याला घेऊन सामाजिक संघटना व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले हे मात्र महत्वाचे!
advertisement
लोकसभा उमेदवारीसाठी आघाडी व युतीत दावेदारांची संख्या वाढतीवर
वर्धा : वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यावर आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होत आलीय. परंतु आता राज्यात सत्ता मिळवण्यासाठी झालेलं फोडाफोडीच राजकारण यामुळं एकाच पक्षाचे दोन गट तयार झाले. हे गट आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहे. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून दावा करणाऱ्याची संख्या वाढणार असल्याने पक्षाच्या वरिष्ठांना चांगलाच डोक्याला ताप राहणार आहे. तर तोडफोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांची ना घर का, ना घाट का अशी अवस्था होणार आहे. भाजपकडून विद्यमान खा. रामदास तडस यांच्यासह आ. रामदास आंबटकर यांचं नाव घेतल्या जातंय. काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार, चारुलता टोकस, अमर काळे यांचं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुबोध मोहिते, शिवसेना शिंदे गटाकडून अशोक शिंदे यांच नाव चर्चेत आहे. मात्र आघाडी व युतीत उमेदवारीवरून काय समेट होतं हे वेळच ठरविणार आहे.
advertisement
वर्ध्याचं जिल्हा कारागृह झालय तुडूंब
वर्धा : वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या पाहता गुन्हेगारीचे प्रमाण वाढतीवर आहे. जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला असला तरी गुन्हेगारांवर करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा दुपट्टीने वाढली आहे. कारागृहाची क्षमता 252 इतकी असतांना ही संख्या दुपट्टीने वाढत 484 वर पोचली आहे. सद्या कारागृहात एकूण क्षमतेपेक्षा 232 कैदी अधिक आहेत. यामध्ये 464 पुरुष 19 महिला आणि एक तृतीयपंथी कैद्याचा समावेश आहे. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील जवळपास 50 टक्के कैदी कारागृहात आहे. तसेच पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. गुन्हेगारी वर्गात तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सर्वाधिक कैदी हे चोऱ्या, दरोड्यातील आहे. जिल्ह्यात खून, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने होताना दिसतात. चालू वर्षात सात महिन्यात जवळपास 15 ते 16 खुनांच्या घटना घडल्या. यावरून इथली परिस्थिती लक्षात येते. या गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची संख्या तसेच चोरी, मारहाणीच्या आरोपींची संख्या कारागृहात जास्त आहे.
advertisement
उपचारासाठी नोंदणी, औषधी मोफतमुळे ओपीडी संख्येत वाढ
वर्धा : राज्यातील युतीच्या सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग व त्यांच्या अखत्यारीतील रुग्णालये व आरोग्य केंद्रातून मोफत वैद्यकीय चाचण्या आणि उपचाराचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यातील 229 शासकीय रुग्णालयात केली जात आहे. नोंदणी केल्यानंतर डॉक्टर रुग्णाला औषध लिहून देत असतील तर थेट 104 टोल फ्री क्रमांकावर रुग्णाला तक्रार करता येणार आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत उपचार मिळत असल्याने रुग्णालयाच्या ओपीडी संख्येत कमालीची वाढ झाली आहे. सद्या जिल्ह्यात साथीच्या आजाराची लक्षणे आढळून येत असल्याने रुग्णांची संख्या वाढतीवर आहे. यात ताप, सर्दी, खोकला असणाऱ्याचा सहभाग आहे. मात्र ग्रामीण भागातील रुग्णालयात खोकला, बीपीच्या औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून येते. जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवानिवृत्त व्हायला आलेले अनेक डॉक्टर आहेत. परंतु ते कधीचं ओपीडी काढत नसल्याचं धक्कादायक वास्तव आहे. सगळा भार हा कंत्राटी बीएचएमएस डॉक्टरांवर आहे. गलेलठ्ठ पगार घेऊन घरूनच सामान्य रुग्णालयातील रुग्णावर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली.
advertisement
भर पावसाळ्यात आर्वीकर करताहेत कृत्रिम पाणी टंचाईचा सामना
वर्धा : आर्वी शहरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांत रोष आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नळ पुरवठा योजना ही 2007 ते 08 पर्यंत नगर पालिकेकडे होती. आता ही योजना प्राधिकरण सांभाळत आहे. आर्वी शहराची लोकसंख्या जवळपास 50 ते 60 हजारांच्यावर आहे.जीवन प्राधिकरणाच्या वतीने शहरातील जनता नगर, एलायजी कॉलनी, जाजुवाडी या तीन मोठ्या जलकुंभातून पाणीपुरवठा शहरातून केला जातो. शहरात साडे बारा हजार कुटुंब असून जवळपास 7 हजार जोडण्या आहे. शहरातील काही भागात चार मोठ्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. शहरात 11 प्रभाग असून 23 वॉर्ड आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये केव्हा पाणी सोडायचे याचे नियोजन केले जाते. मात्र प्राधिकरणाची सर्व यंत्रणा कंत्राटी स्वरूपाची असल्याने नियोजनाचा अभाव दिसून येतो. परिणामी ठराविक वेळेत पाणी सोडल्या जात नाही, याचा फटका नागरिकांना बसताना दिसतोय. यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha News : मालमत्ता कर, तुडूंब कारागृह, कृत्रिम पाणी टंचाई ते राजकारण; गांधींच्या वर्ध्यात नेमकं चाललंय काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement