अनाथांच्या दिवाळीला आधाराचा प्रकाश, मुलींच्या जीवनात रंग भरतायेत दिवे, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीचे दिवे वर्धा येथील उष:काल बालगृहातील निराधार मुलींच्या जीवनात रंग भरण्याचं काम करत आहेत.
वर्धा, 1 नोव्हेंबर: दिवाळीच्या सणानिमित्त घरोघरी दीपप्रज्वलित करून आनंद आणि हर्षोल्लास होतो. या सणाला घरोघरी दिवे लावले जातात. त्यामुळे रंगीबेरंगी दिव्यांचं खास आकर्षण असतं. रंगीबेरंगी दिवे खरेदी करण्यासाठी बाजारात देखील मोठी गर्दी बघायला मिळते. हेच दिवे वर्धा येथील उष:काल बालगृहातील निराधार मुलींच्या जीवनात रंग भरण्याचं काम करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून येथील मुली दिवे रंगवून विक्री करतात. त्यातून येणाऱ्या पैशांवरच या मुलींची दिवाळी साजरी होत असते.
दिव्यांना आकर्षक रंगरंगोटी
दिवाळीनिमित्त संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिवे रंगविणे, पॅकिंग करणे, सेटिंग करणे यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर मुली मोठ्या उत्साहात दिवे रंगवतात. या निराधार मुलींना गेल्या दहा वर्षांपासून दिवे रंगवण्याच्या कामातून आर्थिक सहाय्य मिळत आहे. दिवे विक्रीतून मुलींची दिवाळी साजरी होत असल्याने अनेकजण येथूनच दिवे खरेदी करतात. विद्यार्थ्यांना साधे दिवे उपलब्ध करून दिले जतात. त्यानंतर हे दिवे रंगरंगोटी करून त्याला आकर्षक बनविले जाते. यातून त्यांची कल्पनाशक्ती, समरणशक्ती, एकाग्रता जागृत होण्यास मदत होत असल्याचं समुपदेशक रुपाली फाले सांगतात.
advertisement
दिवे विक्रीतून साजरी होते दिवाळी
बालगृहाला भेटी देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना दिव्यांविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर ते लोक दिवे खरेदी करतात. अनेकदा मोठ्या ऑर्डर्स घेऊन दुसरीकडे हे दिवे विक्री केली जाते. अशाप्रकारे माहिती वाढत जाऊन साखळी तयार होऊन लोक हे दिवे खरेदी करतात आणि या दिव्यांच्या विक्रीतून जे पैसे मिळतात त्यातून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ, कपडे आणि इतर वस्तू मिळण्यास मदत होते. त्यामुळे मोठ्या उत्साहात विद्यार्थी दिव्यांची रंगरंगोटी करतात.
advertisement
अनाथांच्या आयुष्यात आधाराचा प्रकाश
हे दिवे रंगवत असताना मुलींच्या कलागुणांना वाव मिळतो. दिवसेंदिवस हातातील कला जागृत होण्यास मदत होते. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांनी या दिव्यांवर रंगरंगोटी केली जाते. वेगवेगळ्या आकारांची दिवे नागरिकांनाही आकर्षित करतात आणि दरवर्षी मोठ्या संख्येने त्याची विक्रीही केली जाते. दिवाळीचा हा सण दिव्यांच्या ज्योतींनी प्रकाशमान करण्याचा असतो. तसेच समाजभान राखून या विद्यार्थ्यांनी रंगविलेले दिवे खरेदी करण्याची गरज आहे. त्यांनी रंगविलेल्या दिव्यांमध्ये सामाजिक आधाराची ज्योत लावून अनाथांची दिवाळी साजरी करण्यात आपणही खारीचा वाटा द्यायला हवा.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 01, 2023 9:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
अनाथांच्या दिवाळीला आधाराचा प्रकाश, मुलींच्या जीवनात रंग भरतायेत दिवे, Video