राज्यात केळीची अडीच कोटी रोपं पडून, पाहा काय आहे कारण?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी संकटात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळली आहे.
बीड, 6 सप्टेंबर: यंदा पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण राज्यात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतात केलेली पेरणीही वाया जाण्याची चिन्हे आहेत. अशातच फळबागांच्या लागवडीकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा केळीची शेती करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, यंदा पावसाअभावी केळीची लावगड रखडली असून राज्यात अडीच ते तीन कोटी रोपे पडून आहेत, अशी माहिती कृषी अभ्यासक के. जी. शाहीर यांनी दिलीय.
केळी लावगडीकडे पाठ
गेल्या काही काळात बीडमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे खरीप पिके संकटात आली असून पिकांनी माना टाकल्या आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी हवालदील आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी फळबागांची लागवडही रखडली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिना संपला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे केळीची लागवड शेतकऱ्यांनी टाळली आहे. मे आणि जून महिन्यात केळीचे रोपे उपलब्ध होत नव्हती मात्र जुलै, ऑगस्टमध्ये रोपे उपलब्ध झाली. मात्र, आता पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरवली आहे, असे शाहीर यांनी सांगितले.
advertisement
शेतकऱ्यांकडून मागणी नाही
पावसाअभावी मागणी नसल्याने केळीच्या नव्या लागवडी रखडल्या आहेत. राज्यातील विविध टिशू कल्चर लॅबमधील सुमारे अडीच ते तीन कोटी रोपे लागवडी विना पडून आहेत. येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही तर राज्यातील केळी लागवड मोठ्या प्रमाणात धोक्यावर येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
advertisement
गतवर्षी गारपीटमुळे नुकसान
मागील वर्षी तोडणीला आलेले केळीची पीक गारपीटीमध्ये मोठ्या संकटात सापडले. त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान न भरून निघण्याइतके झाले. यामुळे यंदा केळी लागवड करून फायदा होईल का तोटा या विचारात शेतकरी आहे. बाजारात 14 ते 22 रुपये प्रति डझन केळाला दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी केळी लागवडीकडे वळला होता. मात्र आता दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांना दिसून आलीय. त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी केळी लागवड करण्यासाठीची उदासीनता असल्याचे चित्र आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
September 06, 2023 2:16 PM IST