धाराशिवच्या शेतकऱ्याची कमाल, टोकन पद्धतीनं लावली तूर अन् शेंगानं लगडलं झाड
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते हेच धाराशिवच्या शेतकऱ्याने दाखवून दिलेय.
धाराशिव, 5 डिसेंबर: कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यातच निसर्गाचं बदलत चक्र यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडत आहे. असं असलं तरीही काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करताना पाहायला मिळतात. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. याचाच यशस्वी प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुन्हाळीचे शेतकरी श्रीकृष्ण तांबे यांनी केलाय. टोकन पद्धतीने केलेली तूर शेंगांनी लगडून गेलीय.
टोकन पद्धतीने तूर लागवड
श्रीकृष्ण तांबे हे बीएससी कृषी पदवीधर आहेत. नोकरीपेक्षा त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वी शेती करतात. तांबे यांनी तीन एकरावर टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली आहे. त्यामुळे तुरीची वाढ जोमदार झाली आहे. त्यांनी दोन ओळीच्या मधील अंतर आठ फूट इतके ठेवले आहे. तर दोन रोपांच्या मधील अंतर दोन फूट असल्याने झाडांना हवा खेळती राहिल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालाय.
advertisement
फळधारणेत मोठी वाढ
टोकन पद्धतीने तूर लागवड केल्याने झाडाची उंची सात ते आठ फुटापर्यंत वाढली आहे. तर एका झाडाला अंदाजे 400 ते 500 शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नातही मोठी वाढ होणार असपल्याचे तांबे सांगतात. गतवर्षी तांबे यांनी तीन एकर तुरीची पेरणी केली होती. मात्र पेरणी केलेल्या तुरीला त्यांना एकरी सहा क्विंटल पर्यंतचे उत्पन्न मिळाले होते. तर यावर्षी तुरीची वाढ जोमदार झाल्याने आणि टोकन पद्धतीमुळे त्यांना एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे, असे ते सांगतात.
advertisement
तूर पिकाचे नियोजन कसे?
कृषी विभागाकडून मिळालेल्या बीडीएन 716 या तुरीच्या बियाण्यांची त्यांनी तीन एकर क्षेत्रावर टोकन पद्धतीने लागवड केली. त्यास तीन वेळा औषधांची फवारणी, एक वेळा खुरपणी आणि दोन वेळा तुरीला खत दिलेय. तांबे यांनी अवलंबलेली आधुनिक पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. तसेच शेती करीत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते, हेच तांबे यांनी दाखवून दिलेय.
advertisement
काय आहे टोकन पद्धत?
बहुतांश ठिकाणी तुरीची पेरणी केली जाते. परंतु, टोकन पद्धतीत तूर ठराविक अंतरावर लावली जाते. तांबे यांनी दोन ओळीत आठ फूट अंतरावर तुरीच्या बियाणाचे टोकन केले. तर दोन रोपांच्या मध्ये अंतर दोन फूट ठेवले. त्यामुळे तुरीत हवा खेळती राहते आणि झाडाची वाढही जोमदार होते.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 05, 2023 2:05 PM IST