अचानक काही बरं-वाईट झाल्यास Credit card कर्ज माफ होऊ शकतं, 'प्रोटेक्शन कव्हर' बद्दल 99% लोकांना माहीतच नाही
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Credit Card: क्रेडिट कार्डधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या थकबाकीचा बोजा कुटुंबावर पडू नये, यासाठी बँका 'क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग कव्हर'ची सुविधा देतात. अत्यंत कमी प्रीमियममध्ये मिळणारा हा विमा संकटकाळी कर्जाची सर्व रक्कम स्वतः भरतो आणि वारसांना आर्थिक संकटातून वाचवतो.
मुंबई: आयुष्यात कधीही एखादा अपघात घडू शकतो किंवा कुटुंबातील कमावता सदस्य अचानक जग सोडून जाऊ शकतो. अशा वेळी दुःखासोबतच एक वेगळीच भीती कुटुंबाच्या दारात उभी राहते ती म्हणजे क्रेडिट कार्डच्या थकबाकीची. हा कर्जाचा बोजा आता कोण भरणार? बँका वसुलीसाठी फोन करतील का? कायदेशीर नोटिसा येतील का? अशा अनेक प्रश्नांनी कुटुंब अधिकच अस्वस्थ होतं.
मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की क्रेडिट कार्डसोबत मिळणारे एक खास विमा संरक्षण अशा परिस्थितीत कुटुंबाला मोठा दिलासा देऊ शकते. अपघात किंवा मृत्यूच्या प्रसंगी हा विमा क्रेडिट कार्डची संपूर्ण थकबाकी फेडू शकतो. आज अनेक कुटुंबांसाठी हे विमा कव्हर दुर्लक्षित असले तरी अत्यंत महत्त्वाची आर्थिक ढाल ठरत आहे.
या विम्याला क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग कव्हर किंवा क्रेडिट कार्ड लाइफ इन्शुरन्स असे म्हणतात. कार्डधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील क्रेडिट कार्डची थकबाकी फेडण्यासाठी हा विमा मदत करतो, त्यामुळे कुटुंबावर कर्जाचा भार येत नाही.
advertisement
क्रेडिट कार्ड लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड लाइफ इन्शुरन्स हा एक प्रकारचा क्रेडिट प्रोटेक्शन कव्हर आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी थेट संबंधित बँकेला क्रेडिट कार्डची थकबाकी रक्कम अदा करते. साधारणपणे या कव्हरची रक्कम ही कार्डच्या एकूण मर्यादेइतकी किंवा मृत्यूच्या वेळी जितकी थकबाकी आहे, तितकी असते.
हा विमा कसा काम करतो?
क्रेडिट कार्डसोबत हा विमा ॲड-ऑन स्वरूपात घेता येतो. यासाठी दरवर्षी एक ठराविक प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसी कार्यरत असताना कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी थेट बँकेला थकबाकीची रक्कम देते. यामधील महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक वेळा यासाठी सविस्तर वैद्यकीय तपासणीची गरज नसते, त्यामुळे हा विमा अनेकांसाठी सहज उपलब्ध होतो.
advertisement
कोणत्या बँका काय कव्हर देत आहेत?
Axis Bank:
1 लाख रुपयांच्या कव्हरसाठी वार्षिक 560 रुपये प्रीमियम
2 लाख रुपयांच्या कव्हरसाठी वार्षिक 1,120 रुपये प्रीमियम
हा विमा Axis–Max Life Group Saral Suraksha Plan अंतर्गत दिला जातो.
HDFC Bank Infinia Card:
या कार्डवर 9 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड ड्यूज इन्शुरन्स कव्हर मिळते.
हे कव्हर कार्डच्या वार्षिक फीमध्ये (12,500 रुपये + जीएसटी) आधीपासूनच समाविष्ट असते.
advertisement
या विम्याचे फायदे काय?
हा विमा कुटुंबाला कर्जाच्या मानसिक तणावापासून वाचवतो. दुःखाच्या काळात बँकांच्या रिकव्हरी कॉल्स किंवा कायदेशीर नोटिसांची भीती राहत नाही. मृत्यूनंतर विम्याअंतर्गत थकबाकी भरली गेल्यावर पुढील व्याज आणि उशीर शुल्क (लेट फी) देखील थांबते.
कमी खर्चात संरक्षण
टर्म लाइफ इन्शुरन्सच्या तुलनेत या विम्याचा प्रीमियम खूपच कमी असतो, त्यामुळे तो परवडणारा पर्याय ठरतो.
advertisement
पण ही पूर्ण सुरक्षा नाही
तज्ज्ञांच्या मते क्रेडिट कार्ड लाइफ इन्शुरन्सकडे संपूर्ण जीवन विम्याचा पर्याय म्हणून पाहू नये. हा फक्त एक अतिरिक्त संरक्षणाचा स्तर आहे. कुटुंबाला खरी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता हवी असेल, तर चांगल्या टर्म लाइफ इन्शुरन्ससोबत जबाबदार क्रेडिट व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 11:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
अचानक काही बरं-वाईट झाल्यास Credit card कर्ज माफ होऊ शकतं, 'प्रोटेक्शन कव्हर' बद्दल 99% लोकांना माहीतच नाही









