Cyber Crime : कॉल नाही, OTP नाही, फोनचा सिग्नल गेला आणि 11 लाख गायब! महिलेसोबत धक्कादायक प्रकार, नक्की असं काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबईतील एका महिलेसोबत नुकताच असाच एक थरार घडला, ज्यामध्ये तिने कोणताही ओटीपी (OTP) शेअर केला नाही, तरीही तिच्या खात्यातून तब्बल 11 लाख रुपये लंपास झाले.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झाले की आपण तो फोन 'रीस्टार्ट' करतो किंवा थोडा वेळ वाट पाहतो. कधीतरी पाऊस असेल किंवा तांत्रिक बिघाड असेल, असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण सावधान! तुमची ही छोटीशी चूक तुमच्या आयुष्याची मोठी कमाई क्षणात शून्यावर आणू शकते. मुंबईतील एका महिलेसोबत नुकताच असाच एक थरार घडला, ज्यामध्ये तिने कोणताही ओटीपी (OTP) शेअर केला नाही, तरीही तिच्या खात्यातून तब्बल 11 लाख रुपये लंपास झाले.
हा कोणताही साधा तांत्रिक बिघाड नव्हता, तर हे होते एक अत्यंत भयानक 'e-SIM फ्रॉड'.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील या पीडित महिलेच्या फोनचे नेटवर्क अचानक बंद झाले. सुरुवातीला तिला वाटले की हे नेटवर्कचे साधे प्रॉब्लेम असावेत. पण काहीच वेळात तिच्या फोनचे सिग्नल नॉर्मल केले आणि त्याच दरम्यान तिच्या बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज दुसऱ्या डिव्हाइसवर दिसू लागले. अवघ्या काही मिनिटांत 11 लाख रुपये गायब झाले होते. गृह मंत्रालयाच्या I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) या विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
काय आहे हा 'e-SIM' स्कॅम?
आजकाल अनेक नवीन फोन्समध्ये फिजिकल सिम कार्डऐवजी डिजिटल सिम म्हणजेच e-SIM वापरले जाते. सायबर भामटे याचाच फायदा घेत आहेत
बनावट कॉल: ठग स्वतःला टेलिकॉम कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून कॉल करतात.
तुमचे सिम कार्ड 4Gवरून 5Gमध्ये अपग्रेड करायचे आहे किंवा ई-सिम (e-SIM) सक्रिय करायचे आहे, असे ते सांगतात.
advertisement
बोलण्या-बोलण्यात ते तुमच्याकडून तुमचा आधार नंबर, ई-मेल आयडी आणि काही खास कोड मागून घेतात.
या माहितीच्या आधारे ते तुमच्या नंबरचे 'e-SIM' त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर सक्रिय करतात. यामुळे तुमच्या फोनमधील सिम आपोआप बंद होते आणि नेटवर्क गायब होते.
OTP शिवाय पैसे कसे चोरीला जातात?
एकदा का तुमच्या मोबाईल नंबरचा ताबा ठगांकडे गेला की, तुमच्या बँकेचे सर्व मेसेज आणि OTP त्यांच्या फोनवर जायला लागतात. तुम्हाला फोनचे नेटवर्क नसल्यामुळे काय चालले आहे याचा पत्ताही लागत नाही आणि तिकडे चोरटे तुमच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करून मोकळे होतात. मुंबईतील महिलेच्या बाबतीत हेच घडले; तिला सावरायची संधी मिळण्यापूर्वीच खाते रिकामे झाले होते.
advertisement
अशा ठगीपासून स्वतःला कसे वाचवाल?
1. अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका: टेलिकॉम कंपन्या कधीही फोनवरून सिम अपग्रेड करण्याची सक्ती करत नाहीत.
2. ओळख शेअर करू नका: आधार नंबर, जन्म तारीख किंवा कंपनीने पाठवलेला कोणताही एसएमएस कोड अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
3. नेटवर्क गेल्यास सावध व्हा: जर अचानक फोनचे नेटवर्क गेले आणि बराच वेळ आले नाही, तर तातडीने दुसऱ्या फोनवरून कंपनीच्या कस्टमर केअरला किंवा जवळच्या गॅलरीत जाऊन चौकशी करा.
advertisement
4. अधिकृत नंबर ओळखा: बँकिंग कॉल्स सहसा 1600 ने आणि मार्केटिंग कॉल्स 140 ने सुरू होतात. 10 अंकी सामान्य मोबाईल नंबरवरून कोणी बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगत असेल, तर तो फ्रॉड असू शकतो.
फसवणूक झाल्यास काय करावे?
तातडीने 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.
advertisement
'Sanchar Saathi' ॲप किंवा वेबसाईटचा वापर करून तुमची हरवलेली किंवा ब्लॉक केलेली सिम माहिती तपासा.
डिजिटल जगात आपण जितके प्रगत होतोय, तितकेच धोकेही वाढत आहेत. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता हीच तुमची सुरक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 8:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Cyber Crime : कॉल नाही, OTP नाही, फोनचा सिग्नल गेला आणि 11 लाख गायब! महिलेसोबत धक्कादायक प्रकार, नक्की असं काय घडलं?








