Mutual Fund: शेअर मार्केटमध्ये अस्थिरता, म्युच्युअल फंड, SIP चं काय करावं?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
शेअर बाजारातील घसरणीमुळे एसआयपी थांबवावी का, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी एसआयपी सुरू ठेवावी, कारण बाजारात तेजी आल्यावर चांगला परतावा मिळतो.
एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे आता जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमित कालांतराने म्युच्युअल फंडाच्या एखाद्या स्कीममध्ये गुंतवण्याची सुविधा मिळते. मासिक अगदी 500 रुपयांपासूनही यात गुंतवणूक सुरू करता येते. म्युच्युअल फंडातल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून मोठा निधी उभारता येऊ शकतो. गेले चार महिने शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातली गुंतवणूक थांबवावी का, असा प्रश्न पडत आहे. कारण त्यात नफा होत नाहीये; मात्र तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे, की म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. त्यांनी ज्या उद्दिष्टाने गुंतवणूक सुरू केली आहे, त्याकडे लक्ष ठेवून एसआयपी सुरू ठेवली पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. याविषयी अधिक माहिती घेऊ या.
तज्ज्ञ असं म्हणतात, की शेअर बाजारात जेव्हा घसरण होते, तेव्हा गुंतवणूक वाढवण्याची संधी असते. बाजारात घसरण असते, तेव्हा उत्तम फंडात एसआयपी सुरूदेखील करायला हरकत नाही. कारण शेअर बाजारात तेजी येताच, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळेल. शेअरची किंमत कमी असते, तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना अधिक युनिट्स मिळतात. त्यामुळे अधिक पैसे मिळू शकतात.
advertisement
समजा, एखादी व्यक्ती दरमहा एक हजार रुपये एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवत असेल. ती व्यक्ती ज्या फंडात गुंतवणूक करत असेल, त्याच्या एका युनिटची किंमत सध्या घसरून वीस रुपयांवर आली असेल, तर एक हजार रुपयांत सुमारे 50 युनिट्स मिळतील. बाजारात तेजी असली, तर तेवढीच युनिट्स मिळायला आणखी काही काळ लागला असता.
कोरोना काळात शेअर बाजारात 40 टक्के घसरण झाली होती. तेव्हा घाबरून अनेकांनी एसआयपी थांबवली. अनेकांनी किरकोळ भावात फंडविक्री केली. कारण बाजार आणखी घसरला तर काय, याची भीती त्यांच्या मनात होती; मात्र ते गुंतवणूकदार धीराने टिकून राहिले, त्यांची गुंतवणूक वाढली आणि मोठा नफा झाला.
advertisement
म्युच्युअल फंडात घसरण झाली, तर शॉर्ट टर्ममध्ये नुकसान होऊ शकतं; मात्र दीर्घ काळात कधीच नुकसान होत नाही. दीर्घ काळ म्हणजेच कमीत कमी सात वर्षं गृहीत धरली पाहिजेत. शेअर बाजारात काही काळ घसरण दिसली, तरी दीर्घ काळात बाजार चांगला परतावा देतो. त्यामुळे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडातून पैसे कधीही काढू नयेत.
अगदीच खूपच भीती वाटत असली, तर एसआयपी पॉझ करता येऊ शकते. म्हणजे एक ते सहा महिन्यांपर्यंत एसआयपी थांबवता येऊ शकते. तो काळ संपला, की पैसे पुन्हा कट होऊ लागतात. अर्थात यामुळे दीर्घकालीन विचार करता तोटा होऊ शकतो.
advertisement
एसआयपी सुरू करताना फंड निवडताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओमुळे नुकसान कमी होतं. पोर्टफोलिओमध्ये डेट फंड आणि लार्ज कॅप फंड नक्की राखावेत. कारण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीच्या दबावामुळे फंडावरही परिणाम दिसू शकतो. त्यामुळे नुकसानही जास्त होऊ शकतं; मात्र 10 वर्षांचं उद्दिष्ट असेल, तर एसआयपी बिनधास्तपणे सुरू ठेवता येऊ शकते.
advertisement
काही जण थोड्या काळासाठी, काही जण त्याहून अधिक काळासाठी किंवा काही जण दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात. काही जण मिड टर्म आणि शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करत असतील आणि रीडीम करण्याचा काळ आला असेल आणि नुकसान होत असेल, तर काही महिने आणखी थांबणं श्रेयस्कर ठरेल. कारण बजेटनंतर बाजारात थोडी रिकव्हरी पाहायला मिळू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2025 2:11 PM IST