ज्याची भीती होती तेच घडलं; शेअर बाजारातून अखेर ती 'वाईट बातमी' आलीच, आता सावध व्हा नाहीतर सर्व काही गमवाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stock Market: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी निफ्टीचे लक्ष्य कमी करत गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. जगाच्या त्या भागात जेव्हा जेव्हा अस्थिरता वाढते, तेव्हा त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर दिसून येतो. भारतासारखा देश जो आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे, तो या परिस्थितीपासून कसा दूर राहू शकतो? याच अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
जपानची प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नोमुरा (Nomura) यांनी डिसेंबर 2026 साठी निफ्टीचे लक्ष्य जवळपास 15 टक्क्यांनी कमी केले आहे. यापूर्वी निफ्टीसाठी 29,300 चा टार्गेट ठेवण्यात आला होता, तो आता घटवून 24,900 करण्यात आला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास बाजार आता पूर्वी अपेक्षित असलेल्या वेगाने वाढेल, अशी शक्यता कमी दिसत आहे.
16 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या नोटमध्ये नोमुराने म्हटले आहे की जर कच्च्या तेलाच्या किंमती दीर्घकाळ उच्च पातळीवर राहिल्या तर आर्थिक वर्ष 2027 साठी कंपन्यांच्या अपेक्षित कमाईवर 10 ते 15 टक्क्यांपर्यंत नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तेलाच्या वाढत्या किंमती भारतासारख्या आयात-आधारित देशासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
advertisement
आता संकट केवळ किंमती वाढण्यापुरते मर्यादित नाही…
सिटी रिसर्च (Citi Research) यांनीही आपला अंदाज बदलत निफ्टीचे लक्ष्य 28,500 वरून कमी करून 27,000 केले आहे. तज्ज्ञांच्या मते हा प्रश्न आता फक्त वाढत्या किंमतींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पुरवठा साखळी (सप्लाय चेन) खंडित होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
जर खाडी देशांतून येणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आले तर त्याचा परिणाम शेती (विशेषतः खत उद्योग), औषधनिर्मिती आणि पेंट उद्योगासह अनेक क्षेत्रांवर होऊ शकतो. सिटीच्या अहवालानुसार, जर तीन महिने पुरवठा खंडित राहिला तर भारताच्या आर्थिक वाढीचा दर (GDP) सुमारे 0.20 ते 0.30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो आणि महागाईत वाढ होऊ शकते.
advertisement
बाजाराने या दबावाची चिन्हे दाखवण्यास सुरुवातही केली आहे. गेल्या काही काळात निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत. तांत्रिक भाषेत याला ‘करेक्शन’ असे म्हटले जाते.
अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे?
सध्या वाढत्या महागाईकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत असल्याने परदेशी गुंतवणूकदारांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.
advertisement
नोमुराने आपल्या नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती भारतासारख्या आयात-आधारित देशासाठी सर्वात मोठे आव्हान आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आक्रमक गुंतवणुकीपेक्षा आपल्या पोर्टफोलिओची सुरक्षितता महत्त्वाची मानणे अधिक गरजेचे आहे. बाजारातील चढ-उतार काही काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याने घाईघाईने मोठे आर्थिक निर्णय घेण्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 2:58 PM IST
मराठी बातम्या/मनी/
ज्याची भीती होती तेच घडलं; शेअर बाजारातून अखेर ती 'वाईट बातमी' आलीच, आता सावध व्हा नाहीतर सर्व काही गमवाल








