१ एप्रिलपासून घरभाडं, शेअर मार्केटमधली गुंतवणूक महाग; ITR भरण्याच्या नियमातही मोठे बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एप्रिलपासून टॅक्स इयर संकल्पना, सॅलरीवरील मील कार्ड व गिफ्ट सवलत, पुणे इतर शहरांना मेट्रो HRA, शिक्षण भत्ता, F&O वर STT, ITR डेडलाईन असे ७ मोठे बदल
आज मार्च एन्डिंगचा दिवस आहे. 1 एप्रिल तुमच्या आयुष्यात एप्रिल फूल नाही तर खूप मोठे बदल घेऊन येणार आहे. या बदलाचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. अगदी पगारापासून ते ITR पर्यंत 7 नियम बदलणार आहेत. त्यामुळे थेट तुमचा पगार, गुंतवणूक आणि ITR वर परिणाम होणार आहे. तुमच्या सॅलरी स्लीपमध्ये काय बदलणार कोणते 7 नियम बदलणार ते जाणून घेऊया.
१.फायनान्शिअल इयरचा गोंधळ संपला!
आतापर्यंत सामान्य करदात्यांना FY आणि AY असेसमेंट इयर समजताना नाकी नऊ येत होते. आता हे दोन्ही शब्द बाद झाले असून, त्याजागी फक्त TY म्हणजेच टॅक्स इयर हा शब्द येईल. ज्या वर्षात पैसे कमवाल, त्याच वर्षाचा टॅक्स हिशोब आता सरळ आणि सोपा होणार आहे.
२. सॅलरी क्लासला गिफ्ट्स आणि जेवणावर सवलत
ऑफिसकडून मिळणाऱ्या मील कार्ड्सवर आतापर्यंत ५० रुपयांची सूट होती, ती आता थेट २०० रुपये प्रति जेवण झाली आहे. तसेच, वर्षाला मिळणाऱ्या कॉर्पोरेट गिफ्ट वाऊचर्सची टॅक्स-फ्री मर्यादा ५ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे.
advertisement
३. पुणेकरांना मेट्रोचा दर्जा! HRA मध्ये मोठा फायदा
मुंबई-दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्यांना घरभाड्यावर ५०% सवलत मिळते. आता या यादीत पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचाही समावेश झाला आहे. यामुळे या शहरांतील आयटी प्रोफेशनल आणि नोकरदारांची मोठी टॅक्स बचत होणार आहे.
४. घरभाडं क्लेम करताना सांगावं लागणार
जर तुम्ही नातेवाईकांच्या घरात राहून घरभाड्यावर टॅक्स वाचवत असाल, तर आता सावधान! यापुढे केवळ पॅन कार्ड देऊन चालणार नाही, तर 'रेंट रिसीट' अनिवार्य आहे. शिवाय, घरमालकाशी तुमचं नातं काय आहे, हे देखील स्पष्ट करावं लागेल. खोट्या भाड्याच्या पावत्या देऊन टॅक्स वाचवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
advertisement
५. मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा
सरकारने शैक्षणिक भत्त्यात तब्बल ३० पटीने वाढ केली आहे. आतापर्यंत मिळणारे १०० रुपये आता ३००० रुपये प्रति महिना झाले आहेत. तर हॉस्टल अलाउन्स ३०० रुपयांवरून थेट ९००० रुपये करण्यात आला आहे. मध्यमवर्गीय पालकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.
६. शेअर बाजार आणि F&O ट्रेडर्सना झटका
शेअर बाजारात 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स'मध्ये खेळणाऱ्यांसाठी ट्रेडिंग महागलं आहे. ऑप्शन्सवर लागणारा एसटीटी (STT) टॅक्स ०.१% वरून ०.१५% करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक ट्रेडसाठी खिशातून जास्त पैसे मोजावे लागतील.
advertisement
७. ITR भरण्यासाठी आता ऑगस्टची डेडलाईन
पगारदारांसाठी ३१ जुलै हीच तारीख आहे, पण छोटे व्यावसायिक आणि प्रोफेशनल्सना (ज्यांचे ऑडिट नाही) आता ३१ ऑगस्टपर्यंत आयटीआर भरता येणार आहे. आजपासून तुमचं 'टॅक्स प्रोफाइल' पूर्णपणे बदललं आहे. नवे नियम तुमच्या फायद्याचे आहेत की तोट्याचे, हे तुमच्या खर्चाच्या सवयीवर अवलंबून असेल!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 1:49 PM IST
मराठी बातम्या/मनी/
१ एप्रिलपासून घरभाडं, शेअर मार्केटमधली गुंतवणूक महाग; ITR भरण्याच्या नियमातही मोठे बदल









