Business Success Story : आयटीमधील नोकरी सोडून तो बनवतोय भाकरी-चपात्या, कमाई ऐकून बसेल धक्का!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील एका तरुणाने आयटीमधील नोकरी सोडून स्वतःचा भाकरी-चपातीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून हा तरुण बक्कळ कमाई करत आहे.
पुणे : आजच्या स्पर्धात्मक युगात, बहुतांश तरुण आयटी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात स्थिर नोकरी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, काही तरुण या रूढ चौकटीबाहेर जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारतात. पुण्यातील एका तरुणानेही आयटीमधील नोकरी सोडून स्वतःचा भाकरी-चपातीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून हा तरुण महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवतो.
पुण्यातील या तरुणाचे नाव विक्रम मोटे आहे. त्याने आयटीमधील नोकरी सोडून पारंपरिक खाद्यसंस्कृतीला चालना देण्याचा निर्णय घेतला आणि चपातीघर डॉट कॉम या नावाने पुण्यातील तळजाई टेकडी भागात भाकरी-चपातीचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या भाकरी-चपातीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
advertisement
कोरोना काळानंतर नोकरी सोडत हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दिवसाला फक्त 250 चपात्यांपासून सुरुवात झाली होती. परंतु सध्याच्या घडीला तो दिवसाला 2500 ते 3000 चपात्या आणि भाकऱ्या विकतो. प्रामुख्याने गव्हाच्या चपात्या तसेच तांदूळ, ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी या बनवल्या जातात. कॅन्टीन, मेस, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना यांना या सप्लाय केल्या जातात.
advertisement
या व्यवसायातून सध्या 15 ते 20 महिलांना रोजगार मिळाला आहे आणि दर महिन्याला सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. गुणवत्ता आणि सातत्य यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रम सांगतो. त्याच्या या प्रवासात मित्र सुधीर उदार हेही सहभागी असून दोघांनी मिळून चपातीघर डॉट कॉमला यशाच्या दिशेने नेले आहे.
advertisement
विक्रम मोटे यांचा हा प्रवास इतर तरुणांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आधुनिक व्यावसायिक रूप देत त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे यश धाडस, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 02, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Success Story : आयटीमधील नोकरी सोडून तो बनवतोय भाकरी-चपात्या, कमाई ऐकून बसेल धक्का!