Ration Card : 70 लाख लोकांवर संकट, खोटी माहिती देणाऱ्यांकडून सरकार करणार वसुली
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
१ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्ड नियम बदलणार, ७० लाख अपात्र कार्डधारकांवर कारवाई होणार. ई-केवायसी अनिवार्य, खोटी माहिती दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
तुमच्याकडे स्वतःची कार आहे? घरात एसी लावलाय? किंवा तुम्ही आयकर भरता? तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची शक्यता आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डाच्या नियमात मोठे बदल होणार असून, राज्यातील सुमारे ७० लाख अपात्र कार्डधारकांना दणका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्डसाठी खोटी माहिती देत असाल तर आताच सावध व्हा नाहीतर तुम्हालाही त्याचा फटका बसू शकतो.गरिबांच्या ताटातील घास पळवून अनेक श्रीमंत आणि सधन व्यक्तींनी पांढरं रेशन कार्ड खिशात टाकल्याच्या तक्रारी सरकारकडे वाढल्या आहेत.
हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता थेट घराघरात जाऊन केवायसी करण्याचे निर्णय घेतले आहेत. खऱ्या गरजूंनाच धान्य मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. सरकारने आखलेले नवीन निकष अत्यंत कडक आहेत.
advertisement
घरात एसी किंवा ५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर असेल. कुटुंबाकडे स्वतःची चारचाकी कार किंवा ट्रॅक्टर असेल. शहरात राहणाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांच्या वर आणि ग्रामीण भागात २ लाखांच्या वर असेल. १०० चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचं पक्कं घर असेल. कुटुंबातील कोणताही सदस्य इनकम टॅक्स भरत असाल यापैकी कोणतीही गोष्ट असेल तर तुमचं रेशन कार्ड लगेच रद्द केलं जाईल किंवा बंद केलं जाईल.
advertisement
ज्यांनी खोटी माहिती देऊन आजवर स्वस्त धान्य लाटलं आहे, त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. जर चौकशीदरम्यान तुम्ही दोषी आढळलात, तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली केली जाणार आहे.
इतकंच नाही, तर फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. सध्या सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर तुमचं रेशन तात्पुरतं बंद होऊ शकतं. त्यामुळे रेशन दुकानात जाऊन तात्काळ आपली माहिती अपडेट करून घेणे फायद्याचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 2:14 PM IST








