पैसे आहेत पण काढता येत नाहीत, तुमचं अकाउंट तर फ्रीज झालं नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
खाते फ्रीज होणे म्हणजे नेमके काय आणि कोणती संस्था किंवा अधिकारी हे खाते ब्लॉक करण्याचे आदेश देतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याचदा असं होतं की खात्यावर पैसे दिसतात पण काढता येत नाही. अशावेळी मग आपल्याला टेन्शन येतं. खातं फ्रीज तर झालं नाही? असा प्रश्न पडतो. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नियमबाह्य वागल्यामुळे कारवाई केली जाते किंवा 'तुमचे खाते फ्रीज होईल' असे मेसेज येतात. पण हे खाते फ्रीज होणे म्हणजे नेमके काय आणि कोणती संस्था किंवा अधिकारी हे खाते ब्लॉक करण्याचे आदेश देतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
खाते फ्रीज होणे म्हणजे काय?
बँक खाते फ्रीज झाले म्हणजे पुढील सूचना मिळेपर्यंत त्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नाही. याचा अर्थ, तुम्ही त्या खात्यातून पैसे काढू शकत नाही, कोणाला ट्रान्सफर करू शकत नाही किंवा चेकने पेमेंट करू शकत नाही. फ्रीज केलेले असले तरी, खातेधारक आपल्या खात्यावरील शिल्लक रक्कम पाहू शकतो आणि त्या खात्यात पगार किंवा इतर ठेवी जमा होऊ शकतात.
advertisement
खाते फ्रीजचे परिणाम काय होतात?
खाते फ्रीज झाल्यानंतर त्या खात्यात कोणीही रक्कम जमा करू शकत नाही किंवा काढू शकत नाही. तुमच्या खात्यात असलेली रक्कम अडून राहते आणि तुम्हाला ती वापरता येत नाही. यामुळे अनेक आवश्यक गोष्टींवर परिणाम होतो, जसे की, ऑटो डेबिट पेमेंट थांबतात. तुमचे कर्ज पेमेंट, क्रेडिट कार्ड बिल, वीज बिल, म्युचुअल फंड पेमेंट यांसारखे ऑटो डेबिट केलेले पेमेंट अडकतात. जोपर्यंत फ्रीज हटवण्याची सूचना मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक व्यवहार ठप्प होतात.
advertisement
खाते फ्रीज करण्याचे अधिकार कोणाकडे असतात?
बँक खाते फ्रीज करण्याचे अधिकार केवळ बँकेकडेच नसतात, तर काही नियामक संस्था आणि सरकारी प्राधिकरणांना देखील हे अधिकार दिलेले आहेत:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)
आयकर अधिकारी (Income Tax)
न्यायालये (Courts)
याशिवाय, बँकेला स्वतःला जर खात्यात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास, बँक देखील ते खाते फ्रीज करू शकते. मात्र, खाते फ्रीज करण्यापूर्वी संबंधित खातेधारकाला नोटीस पाठवणे बँकेला बंधनकारक असते. नोटीस दिल्याशिवाय बँक खाते फ्रीज करू शकत नाही.
advertisement
बँक खाते फ्रीज होण्याची प्रमुख कारणे
खाते फ्रीज होण्यामागे अनेक कायदेशीर आणि आर्थिक कारणे असू शकतात:
संशयास्पद व्यवहार- मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering), टेरर फंडिंग (Terror Funding) किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कामांसाठी खात्याचा वापर केला जात असल्यास.
कर्ज थकबाकी- नोटीस देऊनही थकीत कर्ज भरले नसल्यास.
थकीत कर- सरकारने किंवा आयकर विभागाने निर्देश दिल्यास, थकीत कर न भरल्यास.
advertisement
न्यायालयाचे आदेश- एखाद्या संस्थेचे किंवा व्यक्तीचे पैसे थकले असल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार.
तुम्हाला तुमचे खाते अशा अडचणीत अडकवायचे नसेल, तर सर्व आर्थिक व्यवहार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 2:21 PM IST