एका दिवसात 9,00,00,00,00,000 रुपये कमावले; कोण झाले मालामाल, घसरणीत खरेदी करणाऱ्यांना लॉटरी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stock Market: आज शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीने मोठी झेप घेत गुंतवणूकदारांना दिलासा दिला. घसरणीनंतर परतलेल्या या तेजीमागे व्हॅल्यू बायिंगपासून ग्लोबल संकेतांपर्यंत अनेक महत्त्वाच्या कारणांचा आधार दिसला.
मुंबई: इराण युद्ध आणि जागतीक पातळीवर सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात काल शेअर बाजारात तब्बल 15 लाख कोटींची संपत्ती नष्ट झाल्याने बाजारात धाकधुक वाढली होती. अशात आज मंगळवारचा दिवस बाजारासाठी दिवाळी सारखाच ठरला. सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना आशेची किरण दिसली आणि दिवस संपेपर्यंत तीच आशा मोठ्या आनंदात बदलली.
निफ्टीने 22,950 चा टप्पा ठामपणे ओलांडला आणि 45 शेअर्स हिरव्या निशाणात बंद झाले. तर सेन्सेक्सही जोरदार तेजीमध्ये दिसला आणि तब्बल 1,372 अंकांची उसळी घेत 74,068 वर पोहोचला. 30 पैकी 28 शेअर्स वाढीसह बंद झाल्याने बाजारात सर्वत्र खरेदीचे वातावरण होते, हे स्पष्ट झाले.
महत्त्वाची बाब म्हणजे केवळ लार्ज कॅपच नाही तर मिडकॅप आणि ब्रॉडर मार्केटनेही या तेजीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मार्केट ब्रेड्थ इतकी मजबूत होती की प्रत्येक घसरलेल्या शेअरच्या तुलनेत 3 शेअर्स वाढले.
advertisement
आजचा हिरो ठरला कॅपिटल मार्केट सेक्टर ज्यात सर्वाधिक तेजी दिसली. L&T सुमारे 5% उसळून टॉप गेनर ठरला. एशियन पेंट्सने 6–8% दरवाढीची घोषणा केली आणि शेअर 4% पेक्षा जास्त वाढला. HDFC बँकेने सलग 4 दिवसांची घसरण थांबवत 3% उसळी घेतली, तर कोटक बँकही 3% ने वधारली.
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा HPCL, BPCL आणि इंडिगो सारख्या शेअर्सना झाला. याशिवाय Kalpataru Projects ला नवीन ऑर्डर्स मिळाल्याने त्या शेअरमध्येही चांगली तेजी दिसली.
advertisement
शेअर बाजारात तेजी परतण्याची 5 प्रमुख कारणे
1) व्हॅल्यू बायिंगचा प्रभाव
अलीकडील घसरणीनंतर गुंतवणूकदारांना दर्जेदार शेअर्स कमी किमतीत मिळाले. निफ्टी आधीच 10% पेक्षा जास्त घसरला होता, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेत खरेदी वाढवली.
2) जागतिक बाजारांचा आधार
आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसली. ज्यात जपान, कोरिया, चीन आणि हाँगकाँगचे बाजार वाढले. अमेरिकन बाजारही सकारात्मक बंद झाल्याने भारतीय बाजाराला बळ मिळाले.
advertisement
3) VIX मध्ये घट
इंडिया VIX, जो बाजारातील भीतीचे मोजमाप करतो तो 4% पेक्षा जास्त घसरून 25.60 वर आला. याचा अर्थ गुंतवणूकदारांची भीती कमी झाली असून आत्मविश्वास वाढला आहे.
4) भू-राजकीय तणावात दिलासा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला 5 दिवसांसाठी पुढे ढकलल्याची बातमी समोर आली. जरी इराणने चर्चेला नकार दिला असला तरी तणाव कमी होण्याची शक्यता बाजारासाठी सकारात्मक ठरली.
advertisement
5) कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई
ब्रेंट क्रूड $110 वरून खाली येत सुमारे $104 वर आला. तेलाच्या किमतीत झालेली ही घट बाजारासाठी चांगली मानली जाते, कारण त्यामुळे महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील दबाव कमी होतो.
टेक्निकल संकेत काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते निफ्टी 22,680 च्या वर टिकून राहिला तर तेजी कायम राहू शकते. मात्र 22,470 च्या खाली गेल्यास पुन्हा घसरण वाढण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 4:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
एका दिवसात 9,00,00,00,00,000 रुपये कमावले; कोण झाले मालामाल, घसरणीत खरेदी करणाऱ्यांना लॉटरी









