आता कोस्टल रोडवरून सर्वसामान्यांचा गारेगार प्रवास, BEST धावणार सुस्साट!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
6 ते 19 रुपयांपर्यंत भाडं देऊन आपण सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कोस्टल मार्गावरून बेस्ट बसनं वेगानं आणि गारेगार असा प्रवास करू शकता.
पियुष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकांदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेस्टनं घेतला आहे. त्यानुसार, 12 जुलैपासून ही सेवा सुरू असेल. 6 ते 19 रुपयांपर्यंत भाडं देऊन आपण सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कोस्टल मार्गावरून बेस्ट बसनं वेगानं आणि गारेगार असा प्रवास करू शकता.
राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडचं काम सुरू होण्याच्या आधीपासूनच बस आणि रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिकेचं नियोजन करण्यात आलं होतं. या मार्गावर अवजड वाहनं, दुचाकी, तीन चाकी आणि पादचाऱ्यांना प्रवेश नाहीये. त्यामुळे इथून केवळ स्वतःचं चारचाकी वाहन किंवा टॅक्सीचाच पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बेस्टनं सर्वसामान्य प्रवाशांना कोस्टल रोडवरून जाणं शक्य झालं असतं. मात्र, सध्या या मार्गाचा थोडासा भाग सुरू झाला असून संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर बेस्ट बसमार्ग ठरवले जातील, असं 'बेस्ट'कडून सांगितलं जात होतं.
advertisement
मात्र आता अखेर मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत कोस्टल रोडची उत्तर मार्गिका खुली झाल्यानंतर 'बेस्ट'कडून बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. संपूर्ण आठवडाभर या मार्गानं बस धावतील.
बस क्रमांक - ए 78 एनसीपीए (नरिमन पॉइंट) - हॉटेल ट्रायडंट - नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह - कोस्टल रोड - पारसी जनरल रुग्णालय जंक्शन- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली) - महालक्ष्मी रेसकोर्स - महालक्ष्मी रेल्वे स्थानक - सात रस्ता भायखळा स्थानक (प.) असा बसचा प्रवास असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 12:20 PM IST