BMC Election: महापालिकेच्या मतदानाआधी मोठा निर्णय, आता बोटाला शाई नाही, तर...
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
BMC Election: मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी विशेष गुलाबी (पिंक) मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
मुंबई: मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि बोगस मतदानास आळा घालण्यासाठी यंदा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर शाईने खूण केली जात होती. मात्र, ही खूण पुसट होणे, पुसली जाणे किंवा त्यावरून तक्रारी होण्याचे प्रकार घडत होते. या पार्श्वभूमीवर यावेळी शाईऐवजी विशेष मार्कर पेनचा वापर करण्यात येणार आहे.
मत नोंदवल्यानंतर मतदाराच्या हातावर उमटणारी ही मार्करची खूण काही वेळात सुकून अधिक गडद आणि पक्की होत जाते. ही खूण पुढील अनेक दिवस टिकून राहते. त्यामुळे ती सहज पुसली जाण्याची शक्यता नाही आणि दुबार मतदानाचे प्रकार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तज्ज्ञांच्या मते या नव्या पद्धतीमुळे शाईबाबत निर्माण होणाऱ्या तक्रारी पूर्णपणे थांबतील.
advertisement
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मार्कर पेनमधील शाई अत्यंत गडद आणि घट्ट असल्याने एकदा मतदान केलेला मतदार पुन्हा मतदान करू शकत नाही. पारंपरिक ब्रशने लावल्या जाणाऱ्या शाईच्या तुलनेत ही पद्धत अधिक प्रभावी आणि अचूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या विशेष मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता आणि त्याचा अनुभव अत्यंत सकारात्मक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मतदानानंतर शाई पुसून दुबार मतदान करण्याच्या शक्यता पूर्णपणे संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर हा क्षण लक्षात राहावा आणि इतरांनाही मतदानासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी यंदा ‘सेल्फी स्पॉट’ उभारण्यात येणार आहेत. मतदारांना येथे फोटो काढून लोकशाही प्रक्रियेतील सहभागाचा आनंद साजरा करता येणार आहे.
मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी विशेष गुलाबी (पिंक) मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आणि महिलांना मतदानाचा अनुभव आनंददायी वाटावा तसेच लोकशाहीतील या महत्त्वाच्या अधिकाराबाबत त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 1:48 PM IST









