Mumbai News: चीनमधून आलेल्या 'त्या' डब्यांत 9 कोटीचं काय होतं? उघडताच मुंबईत खळबळ, बाप-लेकाला अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) एक मोठी कारवाई केली. यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकणारा कोट्यवधींचा माल जप्त केला आहे.
मुंबई: मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) एक मोठी कारवाई केली. यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकणारा कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. चीनमधून अवैध मार्गाने आयात केलेले ९.२५ कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित वॉकी-टॉकी आणि ई-कचरा मानल्या जाणाऱ्या जुन्या हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मुंबईतील दोन कंपन्यांच्या मालक असलेल्या बाप-लेकाच्या जोडीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
२१ कोटींच्या मालात लपवले होते 'बाओफेंग'
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, डीआरआयच्या पथकाने चीनमधून आलेल्या ८ कंटेनरची तपासणी केली. यामध्ये एकूण ३०.२५ कोटी रुपयांचा इलेक्ट्रॉनिक माल होता. यातील २१ कोटींच्या कायदेशीर मालाच्या आड २.५ कोटींचे 'बाओफेंग BF-888S' मॉडेलचे ११ हजार ६० वॉकी-टॉकी आणि ६.७५ कोटींच्या जुन्या हार्ड डिस्क लपवून आणल्या होत्या. चुकीची माहिती देऊन आणि कोणतीही परवानगी न घेता हा माल भारतात आणला जात होता.
advertisement
राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका
जप्त करण्यात आलेल्या 'बाओफेंग' वॉकी-टॉकीवर दूरसंचार विभागाने भारतात बंदी घातली आहे. हे उपकरण विहित मर्यादेपेक्षा जास्त वारंवारतेवर (Frequency) काम करत असल्याने त्याचा वापर अनधिकृत संवादासाठी होऊ शकतो, जो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. तसेच, परकीय व्यापार महासंचालनालयाच्या परवानगीशिवाय जुन्या हार्ड डिस्कची (ई-कचरा) आयात करणे कायद्याने गुन्हा आहे.
advertisement
याप्रकरणी सीमाशुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी या बाप-लेकाची चौकशी सुरू केली आहे. हा माल नक्की कोणासाठी मागवण्यात आला होता आणि याचा वापर कुठे होणार होता, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 9:16 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: चीनमधून आलेल्या 'त्या' डब्यांत 9 कोटीचं काय होतं? उघडताच मुंबईत खळबळ, बाप-लेकाला अटक








