Mahanagar Gas: मुंबईकरांसमोर नवीन संकट, महानगर गॅसच्या उरणच्या प्लांटमध्ये बिघाड, पुरवठा थांबणार!
Last Updated:
सोमवारी संध्याकाळी ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रात तांत्रिक अडचणीमुळे बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातोय. मात्र, ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रामध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून (Mahanagar Gas Limited) गॅस पुरवठा खंडीत होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रात तांत्रिक अडचणीमुळे बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला (CGS) होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
महानगर गॅस लिमिटेड आपल्या घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांना प्राधान्याने विनाखंड पुरवठा करत असतो. पण, जर महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनमधील दाब आणखी कमी झाला, तर मुंबईतील अनेक सीएनजी (CNG) स्टेशनमधील पुरवठा कमी दाबाअभावी थांबू शकतो, असं महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
या बिघाडामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आला आहे. दरम्यान, ओएनजीसीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर महानगर गॅसच्या संपूर्ण नेटवर्कमधील पुरवठा सामान्य होईल, अशी ग्वाहीही महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.
मात्र, ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रक्रिया केंद्रात बिघाड झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल महानगर गॅस लिमिटेडने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mahanagar Gas: मुंबईकरांसमोर नवीन संकट, महानगर गॅसच्या उरणच्या प्लांटमध्ये बिघाड, पुरवठा थांबणार!