मुंबईतून दिवसाला गायब होतायत 4 ते 5 मुली, तरुणींसोबत घडतंय भयंकर, परराज्यात नेऊन...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईत मुलींच्या अपहरणाचं प्रमाण वाढत चालल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. मुंबईतून दरदिवशी चार ते पाच मुली गायब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर मानलं जातं. मुंबईत रात्री अपरात्री एकटी महिला आपल्या घरी जाऊ शकते. रात्री बाहेर पडू शकते. मात्र मागील काही महिन्यात मायानगरीतील हे चित्र काहीसं विरोधीभासी असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत मुलींच्या अपहरणाचं प्रमाण वाढत चालल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. मुंबईतून दरदिवशी चार ते पाच मुली गायब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई खरंच महिलांसाठी तितकी सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
गेल्या दहा महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे तब्बल ११८७ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली असून, इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात मुलींच्या अपहरणाचा आकडा तब्बल १३६ वर गेल्याचं दिसून आलं आहे. यातील १०२ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. मात्र अद्याप ३४ मुली कुठे गेल्या, त्याच्यासोबत काय घडलं? याचा शोध पोलिसांना घेता आला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणांनी शंभरी गाठली आहे.
advertisement
प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्यांची संख्या अधिक
मिळालेल्या माहितीनुसार, घरातून अचानक बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये सर्वाधिक प्रमाण प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचं आहे. घरातून प्रेमाला होणारा विरोध आणि मारहाणीच्या भीतीपोटी या मुली प्रियकरासोबत पळून जाणं पसंत करत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. याशिवाय किरकोळ वाद आणि रागातून घर सोडण्याच्या घटनांचाही समावेश आहे.
advertisement
काही प्रकरणांत मुली सेक्स रॅकेट आणि मानवी तस्करीच्या शिकार ठरत असल्याचं देखील समोर आलं आहे. याशिवाय मुंबईतून अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांना राजस्थान, गुजरातसारख्या ठिकाणी लग्नासाठी विकलं जात असल्याचं देखील कारवाईतून समोर आलं आहे. मुंबई शहरातून दिवसाला चार ते पाच मुली गायब होत असल्या तरी मुंबई पोलीस आणि निर्भया पथकाकडून या मुलींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर समुपदेशन करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतून दिवसाला गायब होतायत 4 ते 5 मुली, तरुणींसोबत घडतंय भयंकर, परराज्यात नेऊन...









