आधी प्रेम, शरीरसंबंध; मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराची पुण्यातील प्रेयसीकडे विचित्र मागणी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणीही तरुणाने मागितली.
पुणे: लग्नाचं खोटं आमिष दाखवून एका महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर त्यानंतर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणीही तरुणाने मागितली. हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपीने धमकावून पीडित महिलेकडून यापूर्वीच १ लाख २२ हजार रुपये उकळले आहेत. या गंभीर प्रकरणी वाघोली पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत एका ३१ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, वीरसेन धीरजकुमार रणशुंगारे (वय ३३, रा. बुधवार पेठ, सोलापूर) या आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी रणशुंगारे यांची सुमारे दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे वचन दिले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आमिषावर विश्वास ठेवून महिलेने त्याला प्रतिसाद दिला. याच दरम्यान, आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
advertisement
जेव्हा महिलेने लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपी वीरसेनने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्याने आपल्या मोबाइलमध्ये काढलेले महिलेचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ वापरून एक क्लिप तयार केली. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भीतीपोटी महिलेने आरोपीला १ लाख २२ हजार रुपये दिले.
advertisement
पैसे घेऊनही आरोपी थांबला नाही. त्याने पीडित महिलेची बहीण आणि तिच्या पतीला हे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. "जर तुम्ही हा विषय कायमचा मिटवायचा असेल, तर समाजात बदनामी टाळण्यासाठी मला १० लाख रुपये द्या," अशी उघड धमकी त्याने दिली. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी रणशुंगारे याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आधी प्रेम, शरीरसंबंध; मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराची पुण्यातील प्रेयसीकडे विचित्र मागणी









