कारागृहातून सुटल्याचा भलताच आनंद; ठाण्यात गेटसमोरच नको ते कृत्य अन् पुन्हा पोहोचला गजाआड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रोहित जगदाळे याची जामिनावर सुटका झाली होती. याचा आनंद साजरा करण्यासाठी तो आणि त्याचे दोन साथीदार थेट आधारवाडी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमले.
ठाणे: तुरुंगातून सुटल्यानंतर सुधरायचे सोडून पुन्हा गुन्हेगारी वृत्ती दाखवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कल्याणच्या आधारवाडी जिल्हा कारागृहातून जामिनावर बाहेर पडताच जल्लोष करण्याच्या नादात आरोपीने नको ते कृत्य केले. शेवटी पोलिसावर हल्ला करणाऱ्या रोहित गणेश जगदाळे याला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. 'जेल'मधून सुटल्याचा आनंद साजरा करताना नियमांची ऐशीतैशी करणे या गुंडाच्या अंगलट आले आहे.
नेमकी घटना काय?
ही धक्कादायक घटना १४ आणि १५ मार्चच्या मध्यरात्री घडली. रोहित जगदाळे याची जामिनावर सुटका झाली होती. याचा आनंद साजरा करण्यासाठी तो आणि त्याचे दोन साथीदार थेट आधारवाडी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. विशेष म्हणजे, कारागृहाच्या सुरक्षेसाठी कुंपणामध्ये ४४० व्होल्टचा विद्युत प्रवाह सुरू असतानाही, या तरुणांनी अत्यंत धोकादायक पद्धतीने फटाके फोडले.
advertisement
पोलिसावरच हात उचलला
प्रवेशद्वारावर तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल देसले यांनी सुरक्षेचे कारण देत त्यांना फटाके फोडण्यापासून रोखले. मात्र, सुटकेच्या नशेत असलेल्या या त्रिकुटाने चक्क खाकी वर्दीवरच हात उचलला. त्यांनी देसले यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी कारागृह अधिकारी अभिजित कोळी यांनी तक्रार दिल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित जगदाळेला अटक केली आहे. त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. ज्या कारागृहातून हा तरुण बाहेर पडणार होता, त्याच कारागृहाच्या गेटवर केलेल्या राड्यामुळे त्याला आता पुन्हा कोठडीची हवा खावी लागत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 1:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कारागृहातून सुटल्याचा भलताच आनंद; ठाण्यात गेटसमोरच नको ते कृत्य अन् पुन्हा पोहोचला गजाआड









