18 वर्ष शेजारी राहिले, एकमेकांवर प्रचंड विश्वास होता पण सोनं बघताच नियत फिरली; कुर्ल्यामध्ये बंटी बबलीच भयानक कांड
- Published by:Prachi Amale
Last Updated:
18 वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या या कुटुंबाने अशा प्रकारे पाठीत खंजीर उपसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील जैन मंदिराजवळ राहणाऱ्या प्रवीण मतकर यांना त्यांच्या शेजाऱ्यांनीच फसवणूक केली आहे आपल्या वकिली करणाऱ्या मुलीच्या लग्नासाठी हौसेने दागिने बनवायला दिलेले 20 तोळे सोने आणि इतर ग्राहकांचे 30 तोळे असे एकूण 50 तोळे सोने घेऊन सुकेंदू सामंता आणि त्याची पत्नी मधुमिता सामंता हे दांपत्य फरार झाले आहे. 18 वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या या कुटुंबाने अशा प्रकारे पाठीत खंजीर उपसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रवीण मतकर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आईचे जुने 20 तोळे सोने नवीन दागिने घडवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या सुकेंदू सामंता याला दिले होते. सामंता दांपत्याने मतकर यांना दागिन्यांचे आकर्षक डिझाईन्स दाखवून महिनाभरात दागिने तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. 18 वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध असल्याने मतकर यांनी कोणत्याही शंकेविना हे दागिने त्यांच्या हवाली केले. मात्र, या विश्वासाचा फायदा घेत सामंता दांपत्याने चोरीचा कट रचला होता.
advertisement
पहाटेच्या अंधारात सहकुटुंब पलायन
17 फेब्रुवारीच्या पहाटे, जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होती, तेव्हा सुकेंदू आणि मधुमिता यांनी आपले बिऱ्हाड गुंडाळले आणि सहकुटुंब घरातून पोबारा केला. मतकर यांना जेव्हा हे समजले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. तपासाअंती उघड झाले की, केवळ मतकरच नव्हे तर इतर 3-4 ग्राहक आणि काही ज्वेलर्सचे मिळून एकूण 50 तोळे सोने या जोडीने लंपास केले आहे. हे पलायन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यात ते बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत.
advertisement
कुर्ला पोलिसांत अखेर एफआयआर दाखल
प्रवीण मतकर यांनी याप्रकरणी तातडीने कुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी सुरुवातीला केवळ तक्रार अर्ज दाखल करून घेतला होता, मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून 18 मार्च रोजी रीतसर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या आधुनिक 'बंटी-बब्ली'चा शोध घेत असून त्यांच्या मूळ गावाकडेही तपासाची चक्रे फिरवली आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
18 वर्ष शेजारी राहिले, एकमेकांवर प्रचंड विश्वास होता पण सोनं बघताच नियत फिरली; कुर्ल्यामध्ये बंटी बबलीच भयानक कांड







