मुंबईतल्या कंपनीत 1,33,00,000 रुपयांची चोरी, CCTV पाहिली अन् सगळेच हादरले, काय घडलं?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोर अत्यंत आत्मविश्वासाने कार्यालयात वावरताना दिसून आला.
मुंबई: दादर–प्रभादेवी परिसरात कार्यरत असलेल्या एका ई-कॉमर्स कंपनीत घडलेली 1.33 कोटी रुपयांची चोरी ही एखाद्या थरारपटातील कथेसारखीच असल्याचे तपासात समोर आले आहे. या चोरीचा उलगडा करताना चोराने केलेल्या एका व्हिडीओ कॉलमुळे संपूर्ण कट उघडकीस आला असून या गुन्ह्याचा मास्टरमाइंड कंपनीतीलच कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी 25 वर्षीय रोशन शिवकुमार जैस्वार याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी कंपनीचे सहसंस्थापक सागर दुबे (वय 27) यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 2018 साली सुरू झालेली ही ई-कॉमर्स कंपनी मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन विक्रीत कार्यरत आहे. कंपनीच्या कार्यालयात विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम तात्पुरती ठेवण्याची पद्धत होती. 16 डिसेंबरपासून जमा झालेले सुमारे 1.33 कोटी रुपये कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आले होते. निवडणूक काळात आचारसंहितेमुळे बँकेत पैसे भरण्यात अडचणी आल्याने ही रक्कम कार्यालयातच ठेवण्यात आली. मात्र शनिवारी सकाळी कार्यालय उघडताच कपाटातील संपूर्ण रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले.
advertisement
कसा मारला डल्ला?
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोर अत्यंत आत्मविश्वासाने कार्यालयात वावरताना दिसून आला. त्याने आधी वीजपुरवठा खंडित केला, बायोमेट्रिक लॉक निष्क्रिय केले आणि डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने कपाट उघडून रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरीदरम्यान तो व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवरून कोणाच्या तरी सूचनांनुसार हालचाली करत असल्याचे स्पष्ट झाले आणि याच धाग्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
advertisement
अखेर गुन्ह्याची कबुली
दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी तपास हाती घेतला. चौकशीत रोशन जैस्वारने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने उत्तर प्रदेशातील रवी कुमार झा याला मुंबईत बोलावून चोरीचा कट रचल्याचे समोर आले. लॉक कसे तोडायचे, कपाट कुठे आहे आणि पैसे कुठे ठेवले जातात याची संपूर्ण माहिती रोशनने व्हिडीओ कॉलद्वारे पुरवली होती. आतापर्यंत पोलिसांनी 1.13 कोटी रुपये जप्त केले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:29 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतल्या कंपनीत 1,33,00,000 रुपयांची चोरी, CCTV पाहिली अन् सगळेच हादरले, काय घडलं?









