तुमच्या घरातपर्यंत पोहोचलाय धोका, एक कॉल अन् महिनाभर ‘अरेस्ट’, बँक अधिकऱ्यासोबत भयंकर घडलं!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Cyber Fraud : निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. तिने स्वतःला टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले.
मुंबई: सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशातच मुंबईतील मुलुंड परिसरातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका निवृत्त बँक व्यवस्थापकाला त्यांच्या कुटुंबासह तब्बल एक महिना ‘डिजिटल अटकेत’ ठेवून तब्बल 1.83 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस दलातील पूर्व सायबर विभागाकडून सुरू आहे.
तक्रारदार हे 62 वर्षीय निवृत्त बँक अधिकारी असून ते मुलुंडमध्ये पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांनी 2020 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 7 जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. तिने स्वतःला टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या नावावर दुसरे सिमकार्ड घेतल्याची माहिती दिली आणि कॉल कथित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जोडला. पुढे स्वतःला ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी’चा अधिकारी महेश कुमार म्हणवणाऱ्या व्यक्तीने घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवली.
advertisement
पुढे कॉल गुन्हे शाखा आणि दिल्ली येथील सीबीआय अधिकाऱ्यांकडे जोडल्याचे नाटक करण्यात आले. स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तक्रारदारांनी कॅनरा बँकेतील खाते नरेश गोयल नावाच्या व्यक्तीस विकल्याचा आरोप केला आणि त्या खात्यातून 2 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग व्यवहाराचा दावा केला. व्हिडिओ कॉलद्वारे सरकारी चिन्ह असलेली बनावट कागदपत्रे दाखवत ‘सुप्रीम कोर्टाचे गुप्त आदेश’ असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
14 ते 31 जानेवारीदरम्यान आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांत आरटीजीएसद्वारे एकूण 1.83 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. यासाठी तक्रारदारांनी मुदतठेवी मोडल्या, सोने गहाण ठेवले आणि शेअर्स विकले. कुटुंबीयांना एका खोलीत बसवून दर 2 तासांनी ‘रिपोर्ट’ देण्यास भाग पाडण्यात आले. कोणालाही माहिती दिल्यास अटक आणि जीवितास धोका असल्याच्या धमक्या देण्यात आल्या.
advertisement
11 फेब्रुवारीनंतर अचानक संपर्क तुटल्यावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी तक्रारदारांनी 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. नागरिकांनी अशा बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 10:26 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तुमच्या घरातपर्यंत पोहोचलाय धोका, एक कॉल अन् महिनाभर ‘अरेस्ट’, बँक अधिकऱ्यासोबत भयंकर घडलं!








