Mumbai Local: मुंबईकरांचे 3 दिवस मेगाहाल! लोकलच्या 277 फेऱ्या रद्द, काय आहे कारण?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Mumbai Local Maga Block: मुंबईकरांना 3 दिवस रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून 277 गाड्या रद्द होणार आहेत.
मुंबई: मुंबईची लोकल सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. आता याच लाईफ लाईनला 3 दिवस ब्रेक असणार आहे. येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 277 लोकल रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाच्या पुर्नबांधणीसाठी शुक्रवार ते रविवार हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मेगाहाल होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.
मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत घेण्यात येणाऱ्या या विशेष ब्लॉकच्या दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी 127 लोकल पूर्णपणे रद्द, तर 60 लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. तर शनिवारी 150 लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येणार असून 90 लोकल अंशत: रद्द करण्यात येतील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. लोकल रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
advertisement
असा असणार विशेष ब्लॉक
भारतीय रेल्वेवरील ‘स्क्रू पायलिंग’वर उभारलेला शवेटचा पूल वांद्रे ते माहीम दरम्यान मिठी नदीवर आहे. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले आहे. याच कामांसाठी 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. तर रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखील ब्लॉक राहील. तसेच 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
advertisement
पहिला ब्लॉक (शुक्रवार-शनिवार) वेळापत्रक
मुंबईत शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही. ब्लॉकनंतर शनिवारी सकाळी विरार स्थानकातून पहाटे 5.47 वाजता पहिली चर्चगेट लोकल धावणार आहे. तर ब्लॉकनंतर शनिवारी चर्चगेट स्थानकातून पहिली डाऊन जलद लोकल 6.14 वाटता सुटेल. तसेच शनिवारी सकाळी चर्चकेट स्थानकातून पहिली डाउन धिमी लोकल सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे.
advertisement
दुसरा ब्लॉक (शनिवार-रविवार) वेळापत्रक
मुंबईत शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात चर्चगेट ते दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहेत. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवली धिम्या आणि जलद लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत. अप जलद मार्गावर शेवटची लोकल विरार ते चर्चगेट रात्री 10.08 मिनिटांनी धावेल. तर डाऊन जलद मार्गावर शेवटची लोकल चर्चगेट ते बोरीवली रात्री 10.33 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर रविवारी सकाळी डाऊन जलद मार्गावर पहिली चर्चगेट-विरार लोकल सकाळी 8.35 वाजता सुटणार आहे. तर जलद मार्गावर पहिली विरार-चर्चगेट लोकल 7.38 वाजता धावणार आहे.
advertisement
या मेल-एक्सप्रेस रद्द
दरम्यान, मुंबई सेंट्रल-हापा-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-इंदौर-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई-दादर स्पेशल ट्रेन, दादर-एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस, दादर-भुसावळ खानदेश एक्स्प्रेस, दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरीवली ते दादर दरम्यान रद्द केल्या आहेत. या गाड्या बोरीवली स्थानकातून धावणार आहेत. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच मुंबईकरांना नियोजन करावे लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांचे 3 दिवस मेगाहाल! लोकलच्या 277 फेऱ्या रद्द, काय आहे कारण?