कोंडीचं टेन्शन संपणार! मुंबई ते बडोदा सुसाट, गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात, वाहतूक कधी सुरू?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Baroda Expressway: मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मुंबई: मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या राज्यातील कामाला वेग आला असून बहुतांश बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गुजरात सीमेजवळील भागापासून भिवंडी जवळील आमने (भोईरगाव)पर्यंत एका मार्गिकेवरून एप्रिलअखेरपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत. या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्हावा–शेवा बंदराकडे जाणाऱ्या कंटेनर आणि अवजड वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे मुंबई आणि ठाणे परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर बंदराकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी आणि वेगवान मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात तलासरी ते रायगड जिल्ह्यातील मुरबे दरम्यान सुमारे 157 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम सुरू आहे.
advertisement
मुरबेपासून पुढे राज्यातील इतर प्रमुख मार्गांशी जोडणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात गुजरात सीमेजवळील भागापासून भिवंडी जवळील भोईरगाव (आमने)पर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे 115 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असून एप्रिलअखेरपर्यंत एका बाजूची वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिली. तसेच उर्वरित पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर जूनअखेरपर्यंत भिवंडीपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, महामार्गाच्या बांधकामादरम्यान आवश्यक साहित्य आणि कामगारांच्या वाहतुकीसाठी काही ठिकाणी अंतर्गत वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. यात तलासरी ते गंजाड (डहाणू) तसेच गंजाड ते नागझरी–मासवण या पट्ट्यांचा समावेश होता. आता गुजरात सीमेजवळील भागापासून पालघर तालुक्यातील वैतरणा नदीपर्यंतचे काम पूर्णत्वाकडे गेल्याने या भागातील अंतर्गत वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सध्या मासवण ते बहाडोली व रावते तसेच सफाळे नवघर ते खानीवडे या काही भागांत द्रुतगती महामार्गाचा वापर सुरू आहे. त्यामुळे सफाळेहून विरारपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिकांना तुलनेने जवळचा मार्ग उपलब्ध झाला असून त्याचा वापर वाढल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
पेनंद–सोनावे दरम्यान वैतरणा नदीवरील पुलाचे काम काही अडचणींमुळे रखडले होते. वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न तसेच अदानी पॉवर कंपनीच्या केबल्समुळे कामात विलंब झाला होता. मात्र हे अडथळे दूर झाल्यानंतर पुलाचे बांधकाम पुन्हा वेगाने सुरू झाले असून ते जूनअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 9:52 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोंडीचं टेन्शन संपणार! मुंबई ते बडोदा सुसाट, गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात, वाहतूक कधी सुरू?








