Mumbai Water Metro: ना वाहतूककोंडी, लोकलची गचांडी! मुंबईत धावणार वॉटर मेट्रो, पाहा कधी आणि कुठं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Water Metro: लोकल, मेट्रो आणि रस्त्यानंतर मुंबईकरांसाठी वाहतुकीचा एक नवा पर्याय खुला होत आहे. कोचीच्या धर्तीवर आता मुंबईतही वॉटर मेट्रो धावणार आहे.
मुंबई : लोकलच्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी, रस्त्यावरची दगदग आणि तासन्तास होणारा ट्रॅफिक याला पर्याय म्हणून लवकरच मुंबईकरांसमोर एक नवा प्रवासाचा मार्ग खुला होणार आहे. राज्य सरकारने मुंबईत ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली असून, सल्लागार म्हणून केरळमधील कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL) यांची निवड झाली आहे. कोचीमध्ये देशातील पहिली वॉटर मेट्रो 2023 मध्ये सुरू झाली होती आणि आता त्याच धर्तीवर मुंबईकरांना जलवाहतुकीचा आधुनिक व आरामदायी अनुभव मिळणार आहे.
प्रवास कसा असेल?
मुंबई वॉटर मेट्रोमध्ये हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्स धावतील. मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 8 महत्त्वाच्या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. या बोटींमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था, एसी डबे, सुरक्षित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे गेट्स असतील. प्रवास करताना खिडकीतून दिसणारा समुद्राचा नजारा हा लोकल किंवा बसपेक्षा वेगळाच अनुभव देईल. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक टर्मिनल्स उभारले जाणार असून, ते मेट्रो स्थानकांप्रमाणे स्वच्छ, वातानुकूलित व सुरक्षित असतील.
advertisement
तिकिट खरेदीसाठी मोबाइल अॅप, क्यूआर कोड बुकिंग यासोबतच ‘कॉमन कार्ड प्रणाली’ची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजेच एकाच कार्डद्वारे प्रवासी लोकल, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रोमध्ये सहज प्रवास करू शकतील.
सुरुवातीचे मार्ग
पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट–बांद्रा आणि बांद्रा–वर्सोवा हे दोन मार्ग निश्चित झाले आहेत. तसेच मीरा-भाईंदर, वसई, गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, कल्याण अशा महत्त्वाच्या भागांना जोडण्याचे नियोजन सुरू आहे. या मार्गांवर जलवाहतुकीमुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रवासही अधिक सुखकर होणार आहे.
advertisement
पर्यावरणपूरक व पर्यटनाला चालना
पारंपरिक डिझेल इंजिनांच्या बोटींऐवजी हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्समुळे प्रदूषण कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रवास केवळ जलदच नाही, तर पर्यावरणपूरकही ठरेल. शिवाय गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, वसई यांसारख्या पर्यटनस्थळांना थेट जोडणी झाल्याने देशी-विदेशी पर्यटकांसाठीही ही सेवा आकर्षण ठरणार आहे.
मुंबईकरांसाठी नवा पर्याय
रस्त्यावरची वाहतूककोंडी आणि लोकलची गचांडी टाळून, मुंबईकरांना आता समुद्रमार्गे मोकळा, सुखकर आणि वेळेची बचत करणारा प्रवास मिळणार आहे. नोकरीवर जाणारा प्रवासी असो की पर्यटक वॉटर मेट्रो प्रत्येकासाठी एक नवा अनुभव ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Metro: ना वाहतूककोंडी, लोकलची गचांडी! मुंबईत धावणार वॉटर मेट्रो, पाहा कधी आणि कुठं?