मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा धोका, BMC नं का केलं आवाहन?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Water Supply: मुंबईकरांना पुढील काही काळ पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं लागणार आहे. काही भागात पाणीपुरवठ्याशी संबंधित दुरुस्ती कामांमुळे दुषित पाणी येण्याची शक्यता आहे.
मुंबई: उन्हाळा सुरू झाला की मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावते. आता पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावं लागेल. तसेच पाणी उकळून आणि गाळूनच प्यावं लागणार आहे. मुंबईत विविध ठिकाणी पाणीपुरवठ्याशी संबंधित दुरुस्तीच्या कामांमुळे काही भागांत पाणीपुरवठा खंडित होणार असून, दूषित पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
वांद्रे परिसरात दुरुस्तीचं काम
एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन आणि वांद्रे पूर्व येथे असलेली 600 मिमी व्यासाची जुनी तुलसी जलवाहिनी 8 एप्रिल 2025 रोजी हटवून त्याऐवजी नवीन पाइप टाकण्याचं काम हाती घेतलं जात आहे. यामुळे ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी
बोरीवली पश्चिमेकडील गोराई आणि कुलवेम परिसरात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणी दूषित झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याचा परिणाम पी उत्तर ते आर मध्य वॉर्ड परिसरात, विशेषतः मनोरी, कुलवेम आणि गोराई येथे झाला आहे.
advertisement
नागरिकांना महापालिकेचा सल्ला
1) पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा.
2) दुरुस्ती दरम्यान आणि त्यानंतर 4-5 दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे.
3) पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2025 10:17 AM IST