PM Modi: पंतप्रधानांवर काँग्रेस महिला खासदारांचा हल्ला करण्याचा कट? भाजपच्या दाव्याने संसदेत खळबळ!
- Reported by:प्रशांत लीला रामदास
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
PM Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आज संसदेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असूनही त्यांचे भाषण होऊ शकले नाही.
नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आज संसदेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असूनही त्यांचे भाषण होऊ शकले नाही. यामागे सुरक्षेचे अत्यंत गंभीर कारण असल्याचे सांगण्यात येत असून, "काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांवर शारीरिक हल्ला करण्याची योजना आखत होत्या," असा खळबळजनक आरोप भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? भाजपचा दावा
भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी सांगितले की, सभागृहात चर्चेदरम्यान काँग्रेसच्या काही महिला खासदारांकडून पंतप्रधानांच्या दिशेने धावून जाण्याचा किंवा शारीरिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. याच धोक्याच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या महिला खासदारांना संरक्षणात्मक कवच म्हणून पंतप्रधान मोदींच्या आसपास आणि पुढच्या बाकांवर बसवण्यात आल्याचे समजते.
advertisement
काँग्रेसच्या महिलाा खासदार या सभागृहात उजव्या बाजूने येणार होते आणि पंतप्रधानांच्या भाषणावेळी त्यांच्यावर हल्ला करणार होते, असा आरोप भाजपने केला.
अध्यक्षांनी कामकाज का थांबवले?
पंतप्रधान भाषणासाठी सज्ज असतानाही लोकसभा अध्यक्षांनी अचानक सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. संसदीय इतिहासात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर न देणे ही एक 'अभूतपूर्व' घटना मानली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांना भाषणापासून रोखले जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधीच लोकसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.
advertisement
काँग्रेसने आरोप फेटाळले...
दरम्यान, भाजपने केलेल्या आरोपांना काँग्रेसने फेटाळून लावले आहे. भाजपकडून फेक नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा पलटवार काँग्रेसने केला. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, निशिकांत दुबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याविरोधात काल सभागृहात आम्ही आक्रमक झालो होतो. पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी जात नव्हतो असेही त्यांनी म्हटले. महिलांना घाबरण्याचे कारण पुढं करत पंतप्रधान सभागृहात येत नसतील तर यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकते असेही धानोरकर यांनी म्हटले.
advertisement
खासदार धानोरकर यांनी म्हटले की, चुकीचे बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मोकळीक असते. पण, विरोधी पक्षनेते बोलण्यास उभे राहिले की माईक बंद केला जातो. पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा काहीही प्रयत्न नव्हता. दुबेंच्या विरोधात आम्ही बोलत होतो. भाजपकडून या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. लोकांची विषयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले. पंतप्रधानांवर सभागृहात कोण हल्ला करेल, हल्ल्याबाबतचा विचारही कोणत्याही खासदारांच्या मनात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
Feb 05, 2026 3:08 PM IST
मराठी बातम्या/देश/
PM Modi: पंतप्रधानांवर काँग्रेस महिला खासदारांचा हल्ला करण्याचा कट? भाजपच्या दाव्याने संसदेत खळबळ!







