Explainer: दिल्लीत ज्यावरून राडा झाला, निवडणूक आयोगही नडतंय, ते राहुल गांधींनी केलेले आरोप कोणते?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीने मत चोरीच्या आरोपावरून आंदोलन केले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. भाजपने पलटवार केला आहे.
नवी दिल्ली: सध्या दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वीच इंडिया आघाडीने दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले. मतांची चोरी झाल्याचा आरोप करत, आघाडीच्या ३०० हून अधिक खासदारांनी संसद भवनासमोर निदर्शने केली.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत, विरोधी पक्षांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर आक्षेप घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनामागील कारण काय?
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 'मत चोरी' विरोधात संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा संसद भवनापासून काही अंतरावरच अडवला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
advertisement
अखेर, पोलिसांनी मोर्चा पुढे जाऊ न दिल्याने नेत्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. काही वेळानंतर पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
आंदोलनादरम्यान, प्रियंका गांधी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. प्रियंका गांधी यांनी "केंद्र सरकार घाबरले आहे," अशी थेट टीका केली. देशातील जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारला आता लोकशाहीच्या सर्व संस्थांचा दुरुपयोग करावा लागत आहे, असे त्या म्हणाल्या.
advertisement
राहुल गांधींनी या लढ्याला राजकीय नसून संविधानाच्या संरक्षणाची लढाई असल्याचे म्हटले. "आम्ही 'एक व्यक्ती, एक मतदान' या तत्त्वासाठी लढत आहोत. आम्हाला एक स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी हवी आहे," अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगावर विश्वासार्हता गमावल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे स्पष्ट केले.
आंदोलनातील सहभाग आणि पोलिसांची कारवाई
या ऐतिहासिक आंदोलनात ‘इंडिया’ आघाडीतील विविध पक्षांचे सुमारे ३०० खासदार सहभागी झाले होते. अनेक खासदारांनी बॅरिकेड्सवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांची एकजूट आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी धरपकड सुरू केली. या कारवाईमुळे विरोधी नेत्यांनी पोलिसांच्या कृतीवरही नाराजी व्यक्त केली.
advertisement
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर १० गंभीर आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर १० गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
गेल्या ५ वर्षांत जेवढे मतदार वाढले नाहीत, तेवढे गेल्या ५ महिन्यांत कसे वाढले?
प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदारसंख्या कशी असू शकते?
निवडणुकांचे वेळापत्रक ठरवून नियंत्रित केले जात आहे.
निवडणूक आयोग डिजिटल मतदान यादी का देत नाही?
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या नियमांमध्ये अचानक बदल का केला गेला?
कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप.
मतचोरीसाठी खोट्या पत्त्यांचा वापर केला जात आहे.
निवडणूक आयोग पुरावे देत नाही, उलट पुरावे नष्ट करत असल्याचा दावा.
फॉर्म ६ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे.
महाराष्ट्रात ५ महिन्यांत ४१ लाख मतदार कसे वाढले?
advertisement
बेंगळुरूतील केस स्टडी: मत चोरीच्या आरोपांना पुष्टी
राहुल गांधींच्या 'मत चोरी'च्या दाव्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी बेंगळुरूतील एक केस स्टडी समोर आणली आहे. बेंगळुरू सेंट्रलमधील मुनी रेड्डी गार्डनमधील १०-१५ चौरस फूट असलेल्या एकाच पत्त्यावर ८० मतदार नोंदवलेले आढळले. घराच्या सध्याच्या रहिवाशांनी त्या लोकांना ओळखण्यास नकार दिला. तसेच, घराच्या मालकाने कबूल केले की, अनेक जुने भाडेकरू आजही त्याच पत्त्यावर मतदान करतात. हा प्रकार मतचोरीचाच असल्याचे राहुल गांधींचे म्हणणे आहे.
advertisement
सत्ताधाऱ्यांचा पलटवार
राहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. मोर्चा काढण्याऐवजी राहुल गांधींनी निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि पुरावे द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने काँग्रेसवर निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्याने असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतील हे आंदोलन इंडिया आघाडीच्या एकजुटीचे आणि सरकारविरोधातील वाढत्या असंतोषाचे प्रतीक असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. आगामी काळात निवडणुकीच्या निष्पक्षतेचा मुद्दा अधिकच गाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि सरकारने या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी आता जोर धरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/देश/
Explainer: दिल्लीत ज्यावरून राडा झाला, निवडणूक आयोगही नडतंय, ते राहुल गांधींनी केलेले आरोप कोणते?


