10 वर्षांच्या अथक प्रयत्नानं झाला मुलगा, आईनं दूध दिलं अन् 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात दूषित पाण्यामुळे 8 जणांचा मृत्यू, 149 रुग्ण दाखल. साधना साहू यांच्या बाळाचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप. मोहन यादव भेट देणार.
स्वच्छ शहारात राहातो याचा अभिमान असणाऱ्या भागातच लाजीरवाणी घटना घडली आहे. ज्या शहराच्या स्वच्छतेचे गोडवे आख्खा देश गातो, त्याच इंदूरमध्ये आज एका आईचा आक्रोश सुन्न करणारा आहे. १० वर्ष देवाकडे घातलेली साकडी, अनेक दवाखाने आणि नऊ महिने सोसलेल्या कष्टांनंतर साधना साहू यांच्या घरात पाळणा हालला होता. पण कुणाला ठाऊक होतं, की नियती इतकी क्रूर असेल? केवळ एका घोटाने या माऊलीच्या १० वर्षांच्या तपस्येचा अंत केला.
दूधात पाणी मिसळलं अन्...
दुधात पाणी मिसळलं अन् नियतीनं डाव साधला. मुलाला दूध द्यायचं होतं. दूध जास्त घट्ट होतं म्हणून त्यांनी त्यामध्ये पाणी मिसळलं आणि मुलाला दिलं. मात्र त्यानंतर मुलाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
६ महिन्यांच्या काळजाच्या तुकड्याने अखेर आपला प्राण सोडला आणि आईनंही टाहो फोडला. आईला वाटलं बाळाची भूक भागेल, तिच्या एका चुकीची किंमत तिला मोजावी लागली. ते पाणी पाणी राहिलं नव्हतं तर विष झालं होतं. ते पाणी पिताच बाळाला उलट्या सुरू झाल्या आणि बघता बघता त्या चिमुरड्यानं आईच्या कुशीतच प्राण सोडले.
advertisement
इंदूरमध्ये 8 लोकांचा बळी
इंदूरच्या भागीरथपुरा परिसरातील दूषित पाण्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली आहे. तर यामुळे 8 जणांचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यानंतर तपास करण्यात आला. तपासात समोर आलं की, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क ड्रेनेजचं सांडपाणी मिसळत होतं.
ज्या आईने १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपलं बाळ गमावलं तिच्यासाठी हे दु:ख खूप मोठं आहे जे पैशांच्या मदतीनं कधीही भरुन निघणार नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
advertisement
१४९ लोकांना सुरू झाल्या उल्ट्या
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १४९ रुग्णांना उलट्या-जुलाब आणि पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भागीरथपुरा परिसरातील मराठी मोहल्ल्यात गेल्या अनेक दिवसांपासून घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज पीडित कुटुंबांची भेट घेणार आहेत.
advertisement
स्वच्छतेच्या पुरस्कारांचे मानकरी ठरणाऱ्या शहरात पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचा जीव जाणे, हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा मानला जात आहे. ज्या शहराच्या स्वच्छतेचा अभिमान देशाला वाटतो, तिथेच मूलभूत गरजांसाठी लोकांना जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 1:39 PM IST
मराठी बातम्या/देश/
10 वर्षांच्या अथक प्रयत्नानं झाला मुलगा, आईनं दूध दिलं अन् 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू










