Loneliness : मुंबई-पुणे सारख्या शहरात नवा बाजार? एकटेपणा दूर करण्यासाठी भाड्याने मिळतो जोडीदार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपलं मन मोकळं करायला कोणीच नाही. हाच तो 'शहरांचा एकटेपणा' आहे, जो आता एका नव्या व्यवसायाला जन्म देत आहे. याच गोष्टीला आता 'लोनलीनेस इकॉनॉमी' (Loneliness Economy) असं म्हटलं जात आहे.
आजच्या धकाधकीच्या युगात आपण सर्वजण एका विचित्र चक्रात अडकलो आहोत. हातात स्मार्टफोन आहे, त्यात सोशल मीडिया आहे आणि त्यावर हजारो फॉलोअर्स आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सतत मेसेजचे नोटिफिकेशन येत असतात; पण तरीही रात्री घरी परतल्यावर मनाच्या एका कोपऱ्यात कमालीचा एकटेपणा जाणवतो. गजबजलेल्या मुंबई, दिल्ली किंवा पुणे सारख्या शहरात राहूनही अनेकदा आपल्याला असं वाटतं की, आपलं मन मोकळं करायला कोणीच नाही. हाच तो 'शहरांचा एकटेपणा' आहे, जो आता एका नव्या व्यवसायाला जन्म देत आहे. याच गोष्टीला आता 'लोनलीनेस इकॉनॉमी' (Loneliness Economy) असं म्हटलं जात आहे.
advertisement
मैत्री आणि संवादासाठी आता 'तिकीट'?हो, हे ऐकायला थोडं अजब वाटेल, पण दिल्ली, गुरुग्राम आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये आता 'पेड सोशल मीटअप' (Paid Social Meetups) वेगाने लोकप्रिय होत आहेत. लोक आता चार घटका निवांत गप्पा मारण्यासाठी, मनातील भीती किंवा भावना व्यक्त करण्यासाठी पैसे मोजून अशा इव्हेंट्सचे तिकीट काढत आहेत. हे स्टार्टअप्स लोकांमधील हा एकटेपणा ओळखून त्यांना एकत्र येण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देत आहेत.
advertisement
लोक का शोधतायत असा 'विकतचा' संवाद?शिक्षण किंवा नोकरीसाठी गावाकडून शहरात आलेले तरुण बऱ्याचदा आपल्या कुटुंबापासून दूर असतात. दिवसभर कामाचा व्याप आणि घरी आल्यावर असलेला रिकामा वेळ त्यांना भावनिकदृष्ट्या एकटं पाडतो. सोशल मीडिया आपल्याला कनेक्शनचा आभास तर देतो, पण प्रत्यक्ष समोरासमोर बसून केलेल्या संवादाची जागा तो कधीच घेऊ शकत नाही. याच 'इमोशनल गॅप'मुळे लोक आता अशा इव्हेंट्सकडे वळत आहेत, जिथे त्यांना केवळ सन्मानजनक आणि सुरक्षित साथ हवी आहे.
advertisement
या इव्हेंट्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे डेटिंग प्लॅटफॉर्म्स नाहीत. इथे येणारा प्रत्येक जण केवळ आपल्या आयुष्यातील अनुभव, नाती, भीती आणि भावनांवर मनमोकळेपणाने चर्चा करण्यासाठी येतो. संवाद अधिक दर्जेदार व्हावा यासाठी सहभागाची संख्या मर्यादित ठेवली जाते आणि केवळ गंभीर लोकच यात येतील याची खात्री करण्यासाठी तिकीट दर आकारले जातात.
advertisement
या नव्या ट्रेंडमध्ये सुरक्षितता ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आयडी व्हेरिफिकेशन (ID Verification), स्क्रीनिंग कॉल्स आणि बॅकग्राउंड चेक केला जातो. अनेक प्लॅटफॉर्म्स तर इथे 'डेटिंग' करण्याला सक्त मनाई करतात. यामुळे महिला असो वा पुरुष, प्रत्येक जण विनासंकोच एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड जरी सकारात्मक वाटत असला तरी, दीर्घकालीन एकटेपणा हे डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराचं कारण ठरू शकतं. विशेषतः लहान शहरांमधून महानगरांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर आहे. डिजिटल जगाच्या पलिकडे जाऊन ऑफलाइन कनेक्शन शोधण्याची ही धडपड सांगतेय की, माणूस अखेर सोशल प्राणी आहे आणि त्याला स्क्रीनपेक्षा जिवंत माणसाच्या संवादाची अधिक गरज आहे.











