एक चूक ज्यामुळे दिल्लीचाही होऊ शकतो वाळवंट! अरावली पर्वतरांग वाचवणं का गरजेचं, नेमकं काय घडतंय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरावली पर्वतरांग दिल्लीसाठी नैसर्गिक सुरक्षा कवच आहे, पण अवैध उत्खनन आणि शहरीकरणामुळे ती धोक्यात आली असून, वाळवंटाचा धोका वाढला आहे. संरक्षण अत्यावश्यक.
देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरासाठी निसर्गाने दिलेले सर्वात मोठे सुरक्षा कवच म्हणजे 'अरावली पर्वतरांग'. मात्र, गेल्या काही दशकांपासून मानवी हस्तक्षेप, अवैध उत्खनन आणि वाढत्या शहरीकरणामुळे या पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जर ही पर्वतरांग नष्ट झाली, तर दिल्लीचे रूपांतर वाळवंटात व्हायला वेळ लागणार नाही, असा धोक्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
अरावली पर्वतरांग केवळ डोंगरदऱ्यांचा समूह नाही, तर ती थारच्या वाळवंटाला रोखून धरणारी एक नैसर्गिक भिंत आहे. राजस्थानकडून येणारे धुळीचे लोट आणि वाळवंटाचा विस्तार रोखण्याचे काम अरावली करते. मात्र, आता या पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी मोठी खिंडारं पडली आहेत. तज्ज्ञांच्या मते, अरावलीमधील नैसर्गिक 'गॅप्स' (मोकळ्या जागा) वाढल्यामुळे वाळवंटी वारे थेट दिल्ली आणि हरियाणाच्या दिशेने सरकू लागले आहेत.
advertisement
वाळवंटीकरण म्हणजे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन ती रेताड होणे. अरावलीमध्ये होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप थांबवणारे कवच नष्ट झाले आहे. यामुळे वाळवंटातील वाळू वाऱ्यासोबत उडून दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामपर्यंत पोहोचत आहे. जर अरावली पर्वतरांग पूर्णपणे जमीनदोस्त झाली, तर दिल्लीतील हवामानाचा समतोल बिघडून पुढील काही दशकांत येथे केवळ वाळू आणि उष्ण लाटांचे साम्राज्य असेल.
advertisement
अरावली हे दिल्ली-एनसीआरसाठी 'वॉटर रिचार्ज' झोन आहे. येथील डोंगर भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. अरावलीची जंगले दिल्लीसाठी 'फुफ्फुसांचे' काम करतात आणि कार्बन शोषून घेतात. या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींचे वास्तव्य आहे, जे निसर्गाच्या साखळीसाठी महत्त्वाचे आहेत.
advertisement
दुर्दैवाने, अरावलीच्या डोंगररांगा कापून तिथे टोलेजंग इमारती, फार्महाऊस आणि रस्ते बांधले जात आहेत. 'मायनिंग माफिया' (खाण माफियांनी) डोंगर पोखरून काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा कडक ताशेरे ओढूनही अवैध उत्खनन छुप्या पद्धतीने सुरूच आहे. डोंगर सपाट झाल्यामुळे वाऱ्याचा वेग अडवणारे नैसर्गिक अडथळे आता उरलेले नाहीत.
advertisement
पर्यावरणवाद्यांच्या मते, ही केवळ दिल्लीची समस्या नाही, तर संपूर्ण उत्तर भारताच्या हवामानावर याचा परिणाम होणार आहे. जर आपण वेळीच अरावलीचे संरक्षण केले नाही आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले नाही, तर भविष्यातील पिढीला हिरवळ नव्हे तर केवळ तापलेले वाळवंट पाहायला मिळेल. अरावली वाचवणे म्हणजे केवळ डोंगर वाचवणे नसून, दिल्लीचे अस्तित्व वाचवणे आहे.











