राग आला..., मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना, 25 गाड्यांचा कोळसा
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वाहन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास 25 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेक वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मुंबईतील दहिसर पूर्व येथील संभाजीनगर परिसरात दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास एका किरकोळ कारणातून भीषण आगीची घटना घडली. येथील एका वाहन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास 25 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेक वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
advertisement
या प्रकरणात एका इसमाने रागाच्या भरात आग लावल्याचे उघडकीस आले आहे. सदर इसम हा पार्किंगच्या समोर असलेल्या चक्की (फ्लोअर मिल) दुकानाचा मालक असून त्याचे नाव तिवारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिवारी यांचा एका व्यक्तीसोबत किरकोळ वाद व हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केल्याचे स्वतः पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात मान्य केले आहे.
advertisement
रागाच्या भरात तिवारी यांनी स्वतःची दुचाकी पेटवली, मात्र पार्किंगमध्ये दुचाकी एकमेकांच्या अगदी जवळ उभ्या असल्याने आग वेगाने पसरली आणि पाहता पाहता जवळपास 25 दुचाकी जळून खाक झाल्या. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपी वाहनांना आग लावताना स्पष्टपणे दिसून आला आहे. या आधारे पोलिसांनी कारवाई करत 60 वर्षीय आरोपी तिवारी यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
advertisement
या आगीत अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही नागरिकांच्या एकाच ठिकाणी दोन ते तीन दुचाकी उभ्या होत्या, त्या पूर्णतः जळून खाक झाल्या. काहींनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती, तर काही दुचाकींमध्ये ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम व इतर साहित्यही आगीत नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
advertisement
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात अशी घटना नवीन नाही. सुमारे सहा महिन्यांपूर्वीही अशाच स्वरूपाची घटना येथे घडली होती. याशिवाय येथे दुचाकींच्या काचा फोडणे, वाहनांचे सुटे भाग चोरीला जाणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी, या परिसरात वाहन खरेदी करणे व पार्क करणे सुरक्षित आहे की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









