Ajit Pawar: अजित पवारांचे नाव बारामती मेडिकल कॉलेजला नको, नामकरणावरून नवा वाद; होळकर घराण्याचा तीव्र विरोध
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बारामती शहराचे नाव बदलून 'अजितदादा' करा, त्याला आमचा विरोध असणार नाही, असेही भूषणसिंह राजे म्हणाले.
पुणे : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी स्वतः या महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचे जाहीर केले होते. आता त्यांच्या निधनानंतर नावाचे राजकारण करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करू नका, अशा शब्दांत होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे यांनी सरकारला सुनावले आहे.
भूषणसिंह राजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालय हा अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हे महाविद्यालय उभे राहिले तेव्हा त्यांनी मोठ्या अभिमानाने या संस्थेला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' यांचे नाव दिले होते. स्वतः अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय बदलणे, हा त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल. अजित पवारांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांनी दिलेले अहिल्यादेवींचे नाव कायम ठेवणे हेच उचित ठरेल...
advertisement
विमानतळाला नाव द्या, शहराचे नाव बदला, पण...
अजित पवारांच्या कार्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अजितदादांचे विकासकामातील योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे पुरंदर येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्या, इतकेच काय तर बारामती शहराचे नाव बदलून 'अजितदादा' करा, त्याला आमचा विरोध असणार नाही. मात्र, ज्या महाविद्यालयाला त्यांनी स्वतः अहिल्यादेवींचे नाव दिले, ते नाव बदलून वाद निर्माण करू नका, अशी मागणी भूषणसिंह राजे यांनी केली आहे.
advertisement
बारामतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
राज्य सरकारने 31 मे 2023 रोजी बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा जुना निर्णय बदलून या महाविद्यालयास स्व. अजित पवार यांचे नाव देण्याच्या चर्चा सुरू झाली आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली असून काही संघटनांनी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदलून दुसरे नाव देण्याच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकारामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
बारामतीकडे राज्याचे लक्ष
महायुतीमधील काही नेत्यांकडून हे नाव बदलण्याचा आग्रह धरला जात असताना होळकर घराण्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. आता सरकार अहिल्यादेवींचे नाव कायम ठेवते की अजित पवारांच्या नावाने नवीन प्रस्ताव आणते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 9:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar: अजित पवारांचे नाव बारामती मेडिकल कॉलेजला नको, नामकरणावरून नवा वाद; होळकर घराण्याचा तीव्र विरोध







