4 दशकांचा रक्तरंजित इतिहास, जीवाला जीव देणारं कुटुंब झालं वैरी, वनराज आंदेकरच्या हत्येमागची स्टोरी!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Bandu Andekar Gang History: पुण्यातील नाना पेठ भागात गणपती विसर्जन सोहळ्याच्या आदल्या दिवशी झालेल्या गोळीबारामुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाला तोंड फुटले आहे.
पुण्यातील नाना पेठ भागात गणपती विसर्जन सोहळ्याच्या आदल्या दिवशी झालेल्या गोळीबारामुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाला तोंड फुटले आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आयुष कोमकर नावाच्या १९ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष क्लासवरून घरी आला होता. तो पार्किंगमध्ये बाइक लावत असताना दबा धरून बसलेल्या दोन जणांनी आयुष कोमकरवर हल्ला केला. त्याच्यावर अकरा गोळ्या झाडण्यात आल्या. यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या अन् यातच त्याचा मृत्यू झाला.
गेल्या वर्षी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून आयुषला संपवल्याची माहिती समोर आली आहे. आयुषचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. याच कारणामुळे आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या मुलाला लक्ष्य केलं. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि आयुष कोमकरचा आजोबा सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यानेच घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी समर्थनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आंदेकर टोळीचा हा संघर्ष आजचा नाहीये. मागील चार दशकांपासून आंदेकर टोळी पुण्यात दहशत राखून आहे.
advertisement
टोळीयुद्धाची पार्श्वभूमी
पुण्यात बंडू आंदेकर टोळीची दहशत मोठी आहे. 90 च्या दशकापासून ही टोळी कार्यरत आहे. अनेक शूटर्स त्याच्या टोळीत काम करतात. नाना पेठ परिसरात खंडणी आणि हफ्ते वसुली करून ही टोळी चालते. बंडू आंदेकरला प्रमोद माळवदकर हत्या प्रकरणात जन्मठेप झाली होती. शिक्षा भोगून तो नुकताच बाहेर आला होता. बंडू आंदेकरची मुलगी संजीवनी ही जयंत कोमकरची पत्नी आणि मृत आयुष कोमकरची काकी आहे. वनराज आंदेकर तिचा सख्खा भाऊ होता.
advertisement
वनराज आंदेकरचा खून कसा झाला?
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. वनराज आंदेकर रस्त्यावर आपल्या काही सहकाऱ्यांशी बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. गोळीबार आणि कोयत्याने वार करत वनराजची हत्या करण्यात आली. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर वनराजची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर आणि इतर काही जणांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. सर्वजण सध्या तुरुंगात आहेत.
advertisement
खरं तर, एकेकाळी आंदेकर आणि कोमकर कुटुंबात घट्ट संबंध होते. आंदेकर आणि कोमकर हे जीवाला जीव देणारं कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं. पण संपत्तीच्या वादामुळे त्यांच्यात मतभेद वाढले आणि त्याचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. वनराज आंदेकरचे काका आणि माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते. मात्र, मनपाने ते दुकान अतिक्रमण कारवाईत पाडले. यामागे तत्कालीन नगरसेवक वनराज आंदेकर असल्याचा कोमकर कुटुंबाला राग होता. यातून दोन्ही कुटुंबातील संघर्षात ठिणगी पडली.
advertisement
गायकवाड-आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध
या घटनेमागे केवळ कौटुंबिक वादच नव्हता, तर बंडू आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैरही कारणीभूत होते. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडे यांच्यावर हल्ला केला होता, ज्यात निखीलचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाड टोळी बदला घेण्याच्या संधीच्या शोधात होती. त्याच काळात कोमकर गटाने गायकवाड टोळीचा वापर करून वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा आहे.
advertisement
आंदेकर घराण्याचा राजकीय दबदबा
आंदेकर कुटुंबाचा राजकारणात मोठा प्रभाव आहे. वनराज आंदेकर 2017 मध्ये पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांची आई राजश्री आंदेकर दोन वेळा नगरसेविका होत्या, तर त्यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
4 दशकांचा रक्तरंजित इतिहास, जीवाला जीव देणारं कुटुंब झालं वैरी, वनराज आंदेकरच्या हत्येमागची स्टोरी!