सिगारेट उधार न दिल्यानं रागात घरात गेला तरुण; कोयता घेऊन बाहेर आला अन्..., बारामतीत खळबळजनक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपी अभिषेक जगताप याने टपरीवर येऊन उधार सिगारेट मागितली. मात्र, उधारी देण्यास प्रतीकने नकार दिला.
पुणे : बारामती तालुक्यातील सांगवी येथे एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण रक्तरंजित संघर्षात झाले आहे. उधार सिगारेट देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या एका तरुणाने आपल्या कुटुंबीयांसह मिळून पिता-पुत्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
वादाचे नेमके कारण: फिर्यादी प्रतीक सुनील जगताप यांची सांगवी गावात पानटपरी आहे. आरोपी अभिषेक जगताप याने टपरीवर येऊन उधार सिगारेट मागितली. मात्र, उधारी देण्यास प्रतीकने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून अभिषेकने प्रतीकला शिवीगाळ आणि मारहाण केली.
advertisement
मारहाणीचा जाब विचारण्यासाठी प्रतीक आणि त्याचा लहान भाऊ सार्थक हे आरोपीच्या घरी गेले. मात्र, आरोपीचे वडील महादेव जगताप, आई गीता आणि बहीण काजल यांनी त्यांचे काहीही न ऐकता उलट त्यांनाच मारहाण सुरू केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले प्रतीकचे वडील सुनील जगताप यांच्यावर अभिषेकने पाठीमागून कोयत्याने वार केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला सार्थकही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. इतकेच नव्हे, तर मध्ये पडलेल्या प्रतीकच्या वृद्ध आजीलाही आरोपींनी धक्काबुक्की केली, ज्यामध्ये त्या जखमी झाल्या.
advertisement
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनील आणि सार्थक जगताप यांना बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अभिषेक, महादेव, गीता आणि काजल जगताप या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार संजय मोहिते पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सिगारेट उधार न दिल्यानं रागात घरात गेला तरुण; कोयता घेऊन बाहेर आला अन्..., बारामतीत खळबळजनक घटना









