advertisement

Mahashivratri 2026 : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर राहणार बंद, कारण काय?

Last Updated:

या कामांमुळे महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर 
मंदिर 
पुणे : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य गर्दीचा विचार करून राज्य सरकारने श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली असून, त्या अंतर्गत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी विविध कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या कामांमुळे महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या भीमाशंकर मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरी मार्गाचे काम, तसेच प्रवेश आणि निर्गमनासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याची कामे सुरू आहेत. त्यासाठी जुना सभामंडप पूर्णतः उतरविण्यात आला असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, दगड, तसेच यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
advertisement
यापूर्वी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर तीन महिन्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामांची व्याप्ती, त्यांचा वेग आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर खुले ठेवणे योग्य ठरणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
advertisement
मागील वर्षी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा कालावधीत लाखो भाविक राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये भीमाशंकर येथे दररोज सुमारे एक लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून विकास आराखड्याची आखणी करण्यात आली आहे.
advertisement
कुंभमेळ्याच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता जुना सभामंडप अपुरा ठरणार असल्याने नवीन भव्य सभामंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच जून ते सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांधकाम करणे अशक्य असल्याने त्याआधी सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Mahashivratri 2026 : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर राहणार बंद, कारण काय?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement