'तुमची पर्स घेऊन जा'; आधी ट्रेनमध्ये चोरी, मग स्वतःच शेअर केलं लोकेशन, पुण्यातील चोराचा अजब प्रताप
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चोरी झाल्यानंतर अनुज सिंग यांनी पत्नीच्या मोबाईलवर सतत फोन केले. आश्चर्य म्हणजे, काही वेळाने चोरट्याने फोन उचलला.
दौंड : रेल्वे प्रवासात चोऱ्या होण्याच्या घटना नवीन नाहीत, पण दौंडमध्ये चोराने दाखवलेल्या एका अजब 'प्रामाणिकपणा'ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लखनऊ-पुणे एक्सप्रेसमध्ये एका माजी सैनिकाच्या पत्नीची पर्स चोरल्यानंतर चोराने अजब प्रकार केला. चोराने चक्क फोन उचलून "तुमची पर्स यवत स्टेशनजवळ टाकली आहे, हवी तर गुगल लोकेशन वापरून शोधून घ्या," असा सल्ला दिला.
नेमकी घटना काय?
सेवानिवृत्त लष्करी जवान अनुज कुमार सिंग (वय ५०, रा. खडकी) हे २० फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह कानपूरहून पुण्याकडे येत होते. एक्सप्रेस यवत रेल्वे स्थानकावरून पुढे जात असताना, एका तरुणाने त्यांच्या पत्नीची पर्स हिसकावली उडी मारून पळ काढला. या पर्समध्ये ८ हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल, घड्याळ आणि महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ३२ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता.
advertisement
चोराचा सल्ला
चोरी झाल्यानंतर अनुज सिंग यांनी पत्नीच्या मोबाईलवर सतत फोन केले. आश्चर्य म्हणजे, काही वेळाने चोरट्याने फोन उचलला. त्याने सिंग यांना सांगितले की, त्याने पर्स यवत स्टेशनजवळ फेकून दिली आहे. एवढेच नाही तर त्याने गुगल लोकेशनच्या मदतीने पर्स शोधण्याचा 'मोफत सल्ला'ही दिला.
पोलिसांची ३५ किमी पायपीट अन् शोध यशस्वी
अनुज सिंग यांनी तत्काळ दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोराने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अरुण टिंगरे आणि खंडागळे यांनी सिंग यांच्यासह यवत परिसरात शोधमोहीम राबवली. रेल्वे रुळांपासून दूर एका निर्जन माळरानात पोलिसांना ती पर्स अखेर सापडली. चोरट्याने त्यातील ८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली होती, मात्र मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे (आधारकार्ड, पॅनकार्ड) सुरक्षित असल्याने सिंग यांना मोठा दिलासा मिळाला.
advertisement
लोहमार्ग पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ही पर्स अनुज सिंग यांच्या स्वाधीन केली. चोराच्या या अजब वागणुकीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 12:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'तुमची पर्स घेऊन जा'; आधी ट्रेनमध्ये चोरी, मग स्वतःच शेअर केलं लोकेशन, पुण्यातील चोराचा अजब प्रताप







