'दानपेटीतील दागिने-पैसे गायब; आलिशान गाड्याही..'; प्रसिद्ध मंदिरात कोट्यवधींचा घोटाळा, पुजाऱ्याच्या आरोपाने खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
विशेषतः 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट करण्यासाठी बनावट पावती पुस्तके छापली गेली आणि त्यातून जमा झालेला पैसा ट्रस्टच्या अधिकृत बँक खात्यात जमा न करता परस्पर हडपला गेला
पुणे : लोणावळ्यातील प्रसिद्ध कार्ला गडावरील आई एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. देवीचे पुजारी गणेश देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत देवस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशमुख यांच्या दाव्यानुसार, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम अध्यक्ष आणि संबंधित प्रशासनाकडून लंपास करण्यात आली असून ट्रस्टच्या मालमत्तेचा वापर वैयक्तिक कामासाठी केला जात आहे.
पुजारी गणेश देशमुख यांनी पुढे असेही नमूद केले की, देवस्थानमध्ये पारदर्शकतेचा मोठा अभाव असून अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. विशेषतः 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट करण्यासाठी बनावट पावती पुस्तके छापली गेली आणि त्यातून जमा झालेला पैसा ट्रस्टच्या अधिकृत बँक खात्यात जमा न करता परस्पर हडपला गेला. इतकेच नाही तर देवस्थानच्या मालकीच्या 'इनोव्हा' आणि 'फॉर्च्युनर' सारख्या महागड्या गाड्यांचा वापर देवस्थानच्या कार्याऐवजी स्वतःच्या खाजगी आणि राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
advertisement
या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे पुराव्यांसह रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आई एकवीरा देवीच्या लाखो भाविकांमध्ये सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'दानपेटीतील दागिने-पैसे गायब; आलिशान गाड्याही..'; प्रसिद्ध मंदिरात कोट्यवधींचा घोटाळा, पुजाऱ्याच्या आरोपाने खळबळ










