Pune : भंगाराचे पैसे कुठे गेले? वादानंतर पतीचं राक्षसी कृत्य, महिलेच्या मर्डरने पुणे हादरलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पैशांच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भंगाराच्या पैशांवरून या दोघांमध्ये वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं.
पुणे : पैशांच्या वादातून पतीने पत्नीला काठीने मारहाण करून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती दत्ता काळुराम जगताप (वय 30) याला अटक केली आहे. दत्ता हा मुळशी तालुक्यातील बेबड ओहळ येथील रहिवासी आहे. 17 जानेवारीला दत्ताचं त्याच्या पत्नीसोबत पैशांवरून भांडण झालं.
मृत्यू झालेल्या महिलेचं नाव कुसुम वसंत पवार (वय 32) असं आहे. बावधन पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसुमच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं आणि तिला 3 मुलं होती. कुसुम आणि तिच्या पतीचा भाऊ दत्ता हे पती-पत्नीसारखे राहत होते. भंगार गोळा करून आणि मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. भंगार गोळा करून मिळणाऱ्या कमाईवरून दत्ता आणि कुसुम यांच्यात वाद सुरू झाला.
advertisement
दत्ताने पत्नी कुसुमला शिवीगाळ सुरू केली आणि त्यानंतर त्याने कुसुमच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर काठीने मारहाण केली. दत्ताच्या या मारहाणीमध्ये कुसुम जमिनीवर पडली, यानंतर त्याने कुसुमच्या डोक्यात दगड घातला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. भांडणामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या महिलेलाही दत्ताने काठीने मारहाण केली, त्यामुळे तिच्या बोटांनाही फ्रॅक्चर झालं आहे.
दत्ताने केलेल्या मारहाणीनंतर या महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी आरोपी दत्ताला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याचसोबत पोलिसांनी कुसुमचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 6:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : भंगाराचे पैसे कुठे गेले? वादानंतर पतीचं राक्षसी कृत्य, महिलेच्या मर्डरने पुणे हादरलं!








