Pune Best Khau Galli : पुणेकरांनो खाण्याची हौस भागवायची आहे? 'ही' खाऊगल्ली कधीही मिस करू नका
Last Updated:
Pune Food : पुण्यातील तरुणाईची लाडकी ही खाऊगल्ली म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गच आहे. सामोसा, भजी, पिझ्झा, आईसक्रीमपासून ते फ्युजन डिशपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं.
पुणे : पुणेकरांच्या खादाड स्वभावाला वेगळा परिचय द्यायची गरज नाही. चोखंदळ रसिकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकाच ठिकाणी मिळाले, की ती जागा अक्षरशः उत्सवाचे ठिकाण बनते. अशीच एक जागा म्हणजे सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनीसमोरील खाऊगल्ली. येथे मिळणारे देशी-विदेशी पदार्थ, तरुणाईचे आकर्षण आणि सततची वर्दळ यामुळे या भागाची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे.
पूर्वी ही गल्ली वडापाव, सामोसा, पॅटिस आणि इडली-चटणी यासाठीच ओळखली जात होती. अनेक छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला गाड्या लावून पदार्थ विकायचे. शाळकरी मुले, समोरील मोबाईल मार्केटमधील व्यापारी किंवा ये-जा करणारे ग्राहक या पदार्थांचा आस्वाद घेत. हळूहळू येथे शिकवण्या, क्लासेस सुरू झाले आणि तरुणाईचा ओघ वाढला. त्या काळात थंडगार कोल्ड कॉफीने तरुणांच्या गप्पांना नवा आयाम दिला.
advertisement
याच धर्तीवर पुढे पाश्चात्य पदार्थांची एंट्री झाली. दावणगिरी डोसा, पराठा, धपाटे, भेळ, पाणीपुरी अशा पारंपरिक पदार्थांबरोबरच पिझ्झा, बर्गर, रोल, पेस्ट्री, केक, मंच्युरियन, स्प्रिंग रोलसारख्या पदार्थांचीही मागणी वाढली. त्यामुळे हा परिसर ‘देशी-विदेशी पदार्थांचे हब’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आज येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळलेली असते.
सकाळच्या वेळी पोहे, उपमा, सांबरपोहे, इडली, वडा, शिरा यांची चव कामावर किंवा कॉलेजला धावणाऱ्यांना ऊर्जा देते. दुपारी धपाटे, पराठे, लोणी डोसा, भेळ किंवा पाणीपुरीसारख्या चटकदार पदार्थांची रेलचेल असते. संध्याकाळी गरमागरम सामोसे, वडापाव किंवा थंडगार कॉफी तरुणांच्या हातात हमखास दिसतात. रात्रीच्या वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किंवा उशिरापर्यंत काम करणारे नोकरदार लोक मेसमध्ये घरगुती जेवणावर ताव मारताना दिसतात.
advertisement
या खाऊगल्लीत केवळ खाद्यपदार्थच नाहीत, तर अनेक नाती जपली गेली आहेत. मित्रांचे गट एकत्र येतात, प्रेयसी-प्रियकराचे रुसवेफुगवे मिटतात, काही नवी नाती रुजतात, तर काही तुटलेली नाती पुन्हा जुळतात. थंडगार कॉफीच्या घोटाने तणाव विरघळतो, तर चमचमीत पदार्थांनी गप्पांना नवा रंग मिळतो. त्यामुळे ही खाऊगल्ली तरुणांसाठी ‘मैत्री कट्टा’ बनली आहे.
सध्या येथे पाश्चात्य पदार्थांचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. थिक कॉफी, पिझ्झा, कॉर्न टिक्की, मंच्युरियन, स्प्रिंग रोल यांची मागणी सर्वाधिक आहे. मात्र या आधुनिक पदार्थांच्या गर्दीतही अस्सल महाराष्ट्रीयन वडापाव, सामोसा आणि इडली-चटणीची खरी चव अजूनही रसिकांच्या जिभेवर रेंगाळते आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Best Khau Galli : पुणेकरांनो खाण्याची हौस भागवायची आहे? 'ही' खाऊगल्ली कधीही मिस करू नका