नितीन गडकरींचा पुणेकरांना 50 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'मेगा प्लॅन' जाहीर
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुणे-शिरूर कॉरिडॉरपासून ते मुंबई-बेंगळुरू नवीन महामार्गापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.
पुणे: पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 50 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली आहे. पुणे आता प्रदूषणमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार, असा विश्वास व्यक्त करत गडकरी यांनी पुणे विभागातील सहा महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) आज पार पाडले. यामध्ये पुणे-शिरूर कॉरिडॉरपासून ते मुंबई-बेंगळुरू नवीन महामार्गापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.
वारकरी संप्रदायासाठी आनंदाची बातमी म्हणजे देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढच्या महिन्यात मी स्वतः या दोन्ही मार्गांचे परीक्षण करण्यासाठी प्रवास करणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गांचे लोकार्पण केले जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. दिवे घाटातील कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे.
advertisement
वाहतुकीचा वेग वाढवणारे पाच महत्त्वाचे प्रकल्प
- पुणे-शिरूर कॉरिडॉर: 54 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 7515 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर: 53 किलोमीटरचा हा मार्ग 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून उभारला जाईल, ज्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
- पुणे-सोलापूर (हडपसर-यवत): 31 किलोमीटरच्या या मार्गासाठी पाच हजार कोटींची तरतूद आहे.
- नाशिक फाटा ते खेड: 7808 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुण्याच्या उत्तर भागातील कोंडी फोडण्यासाठी गेमचेंजर ठरेल.
- पुणे-सातारा रस्ता: या रस्त्यासाठी 6 हजार कोटींचा नवा डीपीआर (DPR) तयार केला जाणार असून मुंबई-पुणे जुन्या हायवेचेही नूतनीकरण केले जाईल.
advertisement
गडकरी यांनी पुण्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी पाच मोठ्या प्रकल्पांची माहिती दिली. या प्रकल्पांमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अवघ्या सव्वा दोन तासांत कापणे शक्य होणार आहे.
नवे महामार्ग आणि राज्य सरकारला आवाहन
मुंबई ते बेंगळुरू दरम्यान एक नवीन महामार्ग बांधण्यात येणार असून तो जेएनपीटी (JNPT) बंदरापासून सुरू होऊन पुण्यातून जाईल. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने वाळू आणि खडी यांसारख्या कच्च्या मालावरील रॉयल्टी माफ करावी, अशी विनंती गडकरींनी केली आहे. तसेच कात्रज उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून रिंगरोडचे काम राज्य सरकारमार्फत वेगाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
या 'मेगा प्रोजेक्ट्स'मुळे पुण्यातील प्रदूषण कमी होऊन आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 4:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
नितीन गडकरींचा पुणेकरांना 50 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'मेगा प्लॅन' जाहीर








