Pune News: पुण्यामुळे इतरांना फटका! शहराच्या पाणी वापराबाबत महापालिकेला नोटीस, आयुक्तांना थेट इशारा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शहराला दररोज ८९२ दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महापालिका सध्या दररोज तब्बल १३५० एमएलडी पाणी उचलत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
पुणे : पुणे महापालिकेने मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरल्याने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने (MWRRA) पुणे महापालिकेला पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धराने यांनी ही नोटीस बजावली आहे. महापालिकेने प्राधिकरणाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि आदेशांचे उल्लंघन केल्याचा गंभीर ठपका यात ठेवण्यात आला आहे.
पुणे शहरासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये प्राधिकरणाने वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (TMC) पाणीसाठा मंजूर केला होता. त्यानंतर, ऑक्टोबर २०१८ मध्ये खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेला वार्षिक ११.५० टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार, शहराला दररोज ८९२ दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या मंजूर कोट्याकडे दुर्लक्ष करत महापालिका सध्या दररोज तब्बल १३५० एमएलडी पाणी उचलत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
advertisement
महापालिका निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने हवेली, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे, असा थेट ठपका या नोटिशीमध्ये ठेवण्यात आला आहे. लोकसंख्येच्या निकषांनुसार नागरिकांना पाणीपुरवठा करणे, पाण्याचे योग्य अंदाजपत्रक सादर करणे, प्रतिज्ञापत्र देणे आणि विशेषतः २०१८ ते २०२५ या कालावधीत प्राधिकरणाने सुनावणीमध्ये दिलेल्या अनेक आदेशांकडे महापालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नोटिशीत नमूद आहे. खडकवासला धरणातून पाणी घेण्याची यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात असूनही, प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन करून मर्यादेत पाणी घेण्याची जबाबदारी महापालिकेने पाळली नाही, असं यात म्हटलं आहे.
advertisement
या गंभीर त्रुटींमुळे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण अधिनियम, २००५ च्या कलम २६ अन्वये कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्राधिकरणाने महापालिकेला दिलेल्या नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे. महापालिकेने यापूर्वी दिलेल्या सर्व आदेशांचे आणि सूचनांचे पालन कसे, कधी आणि किती प्रमाणात केले, याचे सविस्तर स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र एका महिन्यात सादर करावे. अन्यथा महापालिकेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 1:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यामुळे इतरांना फटका! शहराच्या पाणी वापराबाबत महापालिकेला नोटीस, आयुक्तांना थेट इशारा











