तृतीयपंथीयांसाठी पूजा ठरल्या आशेचा किरण, एका क्लिकवर सुटणार आता प्रश्न,आणला खास APP
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तृतीयपंथी व्यक्तींना स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने पूजा कदम किरण ॲप विकसित करत आहेत.
पुणे: पिंपरी-चिंचवड येथील पूजा कदम तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींना स्वावलंबी, सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने पूजा कदम किरण ॲप विकसित करत आहेत. नुकत्याच चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत किरण ॲपने राज्यातील पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहे. ही स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती, आणि पुणे विभागातून कदम यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
अनेक अडचणींचे उत्तर एकाच ठिकाणी..
पूजा कदम यांनी सांगितले की, तृतीयपंथी व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी किरण हे ॲप विकसित करण्यात येत आहे. या ॲपमुळे तृतीयपंथी व्यक्तींचे अनेक प्रश्न एकाच ठिकाणी सोडवता येतील. या ॲपमध्ये शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सेवा, तक्रार निवारण, कायदेशीर मदत, क्रीडा आणि शारीरिक विकास तसेच रोजगारासंबंधी माहिती मिळणार आहे. किरण ॲपच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना रोजगार, आरोग्य सेवा, समुपदेशन, सुरक्षिततेची माहिती आणि विविध शासकीय योजनांची माहिती एका ठिकाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
ही कल्पना कशी सुचली?
पूजा कदम यांनी सांगितले की, कामानिमित्त बाहेर असताना त्यांची एका तृतीयपंथी व्यक्तीशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी विचारले की पैसे मागण्याऐवजी एखादे काम का करत नाही? यावर तृतीयपंथी व्यक्तीने आपल्यासमोर असलेल्या अडचणी मांडल्या. रोजगाराच्या संधींचा अभाव, काम मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच समाजाकडून मिळणारी दुय्यम वागणूक यांसारख्या अनेक समस्या त्यांनी सांगितल्या. या संवादातून तृतीयपंथी व्यक्तींच्या अडचणी एकाच ठिकाणी सोडवता याव्यात, अशी कल्पना पूजा कदम यांच्या मनात आली. त्यातूनच त्यांच्या सर्व समस्या, गरजा आणि संधी एका व्यासपीठावर मांडण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात येत आहे.
advertisement
सुरुवातीला हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राबवावा. त्यानंतर हा राज्यभर राबवावा, अशी मागणी पूजा यांनी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तृतीयपंथीयांसाठी पूजा ठरल्या आशेचा किरण, एका क्लिकवर सुटणार आता प्रश्न,आणला खास APP








