पुणेकरांनो, श्वास घेताय की विष? 'त्या' 7 लाख गाड्यांमुळे आयुष्य होतंय कमी; सर्वेक्षणात मोठे खुलासे!
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शहरात धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी अवघी १० टक्के (सुमारे ७ लाख) वाहने १५ वर्षांहून जुनी आहेत.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या फुफ्फुसांत दररोज किती विष जात आहे, याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शहरात धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी अवघी १० टक्के (सुमारे ७ लाख) वाहने १५ वर्षांहून जुनी आहेत. पण तीच शहराच्या प्रदूषणाला मुख्यत्वे जबाबदार आहेत. या जुन्या वाहनांवर बंदी घातल्यास पुणेकरांचे आयुष्य वाढणार असून प्रदूषणात मोठी घट होणार असल्याचा दावा 'इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी' (ITDP) इंडियाने केला आहे.
प्रदूषणाचा विळखा: संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, शहरातील हवेतील पीएम २.५ (PM 2.5) या अतिसूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात वाहतुकीचा वाटा तब्बल ४६ टक्के आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०१२ ते २०१९ या काळात या उत्सर्जनात ९१ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. केंद्र सरकारने बीएस-६ मानके लागू केली असली, तरी पुण्यातील ७० टक्के वाहने अजूनही जुन्या बीएस-४ प्रकारातीलच आहेत.
advertisement
१५ वर्षांपेक्षा जुनी झालेली डिझेलवरील अवजड वाहने संख्येने कमी असली, तरी ती ओकत असलेला धूर सर्वाधिक विषारी आहे. तज्ज्ञांच्या मते, या वाहनांवर बंदी घातल्यास नायट्रोजन ऑक्साइड आणि घातक कणांच्या उत्सर्जनात ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. यामुळे शहराची हवेची गुणवत्ता (AQI) सुधारेल आणि श्वसनाच्या आजारांमुळे कमी होणारे पुणेकरांचे सरासरी आयुष्य पुन्हा वाढण्यास मदत होईल.
advertisement
काय आहे प्रकरण?
पुणे शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना बंदी घातली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्याच्या रस्त्यांवर धावता येणार नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, श्वास घेताय की विष? 'त्या' 7 लाख गाड्यांमुळे आयुष्य होतंय कमी; सर्वेक्षणात मोठे खुलासे!







