32 वर्षीय तरुण पुणे विमानतळावर उतरला; हातात बॅग आणि त्यात 5 खेळण्यांचे बॉक्स, उघडताच एअरपोर्टवर खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जेव्हा या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली, तेव्हा त्यात लहान मुलांच्या खेळण्यांचे ५ बॉक्स सापडले.
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचा एक मोठा आणि धक्कादायक डाव सीमा शुल्क विभागाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. बँकॉकहून आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाच्या बॅगेतून तब्बल ५ कोटी ४२ लाख रुपयांचे 'हायड्रोपोनिक वीड' (उच्च दर्जाचा गांजा) जप्त करण्यात आले आहे. खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून आणलेला हा साठा पाहून खुद्द अधिकारीही चक्रावून गेले.
गुप्त माहिती आणि एअरपोर्टवरील थरार
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बँकॉकहून 'एअर इंडिया एक्स्प्रेस'चे विमान पुणे विमानतळावर उतरले. 'एअर इंटेलिजन्स युनिट'ला या विमानातून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. यादरम्यान, एका ३२ वर्षीय प्रवाशाच्या संशयास्पद हालचालींमुळे अधिकाऱ्यांनी त्याला रोखले आणि तपासणीसाठी ताब्यात घेतले.
खेळण्यांच्या बॉक्समध्ये 'काळा' बाजार
जेव्हा या प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली, तेव्हा त्यात लहान मुलांच्या खेळण्यांचे ५ बॉक्स सापडले. आरोपीने अत्यंत चलाखीने अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी या बॉक्सचा वापर केला होता. विशेष म्हणजे, स्कॅनिंग मशीनमध्ये अमली पदार्थ दिसू नयेत, यासाठी त्याने हे वीड चक्क कार्बन पेपरमध्ये गुंडाळून ठेवले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. या बॉक्समधून सुमारे साडेपाच किलो 'हायड्रोपोनिक वीड' हस्तगत करण्यात आले.
advertisement
आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि कारवाई
जप्त केलेल्या या हायड्रोपोनिक वीडची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ५ कोटी ४२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित तरुणाला 'एनडीपीएस' (NDPS) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पुण्यात अमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही तीव्र राहणार असल्याचा इशारा सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राहुल गावंडे यांनी दिला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
32 वर्षीय तरुण पुणे विमानतळावर उतरला; हातात बॅग आणि त्यात 5 खेळण्यांचे बॉक्स, उघडताच एअरपोर्टवर खळबळ







