'मी तलाठी, तुमची पेन्शन वाढली आहे..'; बोलण्याच्या बहाण्याने महिलेजवळ गेला अन् धक्कादायक कांड, पुण्यातील घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"मी तुमच्या गावचा तलाठी आहे, तुमची पेन्शन वाढली आहे," असे सांगून तो महिलेच्या जवळ गेला अन्...
पुणे : पुणे जिल्ह्यातील बेल्हे (ता. जुन्नर) येथे एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेला 'मी तुमचा तलाठी आहे' अशी खोटी बतावणी करून लुबाडण्यात आलं. आता महिलेला लुबाडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पेन्शन वाढवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
नेमकी घटना काय?
पारनेर तालुक्यातील डोंगरवाडी येथील उल्हासाबाई संतू डोंगरे (वय ६८) या काही दिवसांपूर्वी बेल्हे येथील बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या होत्या. तिथे आरोपी ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (वय ४५, रा. अहिल्यानगर) याने त्यांना गाठले. "मी तुमच्या गावचा तलाठी आहे, तुमची पेन्शन वाढली आहे," असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल आणि पैसे भरावे लागतील, असे सांगून त्याने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला.
advertisement
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास चक्रे फिरवून आरोपी ज्ञानदेव चेडे याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून १ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे २७.९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
advertisement
आरोपी ज्ञानदेव चेडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही फसवणूक आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश टाव्हरे, विनोद गायकवाड आणि पंकज पारखे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 10:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'मी तलाठी, तुमची पेन्शन वाढली आहे..'; बोलण्याच्या बहाण्याने महिलेजवळ गेला अन् धक्कादायक कांड, पुण्यातील घटना








