पुण्यातील व्यावसायिकाची साडेचार कोटीची फसवणूक; पण पोलिसांचा तो निर्णय अन् सायबर चोरट्यांना एक रूपयाही मिळाला नाही
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलाद (स्टील) खरेदीच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ४ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केली होती. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश आले आहे.
पुणे: ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा उच्चशिक्षित लोकही या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकताना दिसतात. मात्र, अशातच आता पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलाद (स्टील) खरेदीच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ४ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केली होती. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे ही संपूर्ण रक्कम व्यावसायिकाला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
प्रकरण नेमकं काय?
संबंधित बांधकाम व्यावसायिकाला आपल्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात स्टील हवे होते. त्यांनी इंटरनेटवर स्टील पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची माहिती शोधली. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी मध्यस्थ बनून त्यांच्याशी संपर्क साधला. "माल पुण्यात पाठवण्यासाठी आधी पैसे भरावे लागतील," असे सांगून चोरट्यांनी दोन वेगवेगळे बँक खाते क्रमांक दिले. विश्वासापोटी व्यावसायिकाने एका खात्यात २ कोटी २७ लाख आणि दुसऱ्या खात्यात २ कोटी २७ लाख, असे एकूण साडेचार कोटी रुपये जमा केले. पैसे मिळताच चोरट्यांनी आपले मोबाईल बंद करून पोबारा केला.
advertisement
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तातडीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर उपायुक्त विवेक मासाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधला. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ती रक्कम इतर खात्यात वर्ग होण्यापूर्वीच 'फ्रीज' केली. यामुळे चोरांच्या हाती एक रुपयाही लागला नाही आणि व्यापाऱ्याचे कोट्यवधी रुपये सुरक्षित राहिले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 12:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील व्यावसायिकाची साडेचार कोटीची फसवणूक; पण पोलिसांचा तो निर्णय अन् सायबर चोरट्यांना एक रूपयाही मिळाला नाही









