Pune Crime: आधी अपहरण, मग दगडाने ठेचून घेतला जीव; पुण्यातील घटना, धक्कादायक कारण समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मंगळवारी दुपारी आरोपींनी प्रसादला काळेपडळ येथून कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला फुरसुंगी येथील गणपती मंदिराच्या जवळील एका मोकळ्या मैदानात नेण्यात आले.
पुणे : पुण्यातील हडपसर जवळील काळेपडळ परिसरातून एका 22 वर्षीय तरुणाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी टोळक्याने फुरसुंगी येथील एका निर्जन स्थळी नेऊन तरुणाचा जीव घेतला. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून फुरसुंगी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह तिघांना जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वीरभद्र देवज्ञे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी आरोपींनी प्रसादला काळेपडळ येथून कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला फुरसुंगी येथील गणपती मंदिराच्या जवळील एका मोकळ्या मैदानात नेण्यात आले. तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून प्रसादवर दगड आणि लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रसादचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच फुरसुंगी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. मुख्य आरोपी किरण भैरू चव्हाण (३२) आणि रोहित भरत गायकवाड यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर दोन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण आणि मृत प्रसाद यांच्यात दोन-अडीच महिन्यांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. याच वादाचा सूड उगवण्यासाठी किरणने आपल्या साथीदारांसह अपहरणाचा आणि खुनाचा कट रचला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि एसीपी अनुराधा उदमले यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: आधी अपहरण, मग दगडाने ठेचून घेतला जीव; पुण्यातील घटना, धक्कादायक कारण समोर









