पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न, दोघं आयटी कंपनीत नोकरीला; पण वर्षभरात झाली अशी अवस्था, कोर्टानंही तात्काळ दिला घटस्फोट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दोघेही परदेशात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. मात्र, लग्नानंतर अवघ्या ११ महिन्यांतच त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले.
पुणे: थाटामाटात झालेलं लग्न, आयटी क्षेत्रातील उच्च पद आणि परदेशातील आलिशान आयुष्य... हे सर्व असूनही एका तरुण जोडप्याचा संसार अवघ्या ११ महिन्यात विस्कटला. पुण्यातील एका हाय-प्रोफाइल घटस्फोटाच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने 'कूलिंग ऑफ पीरियड'चा (सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी) नियम शिथिल करत दोघांना तातडीने विभक्त होण्याची परवानगी दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सागर आणि आरती (नावे बदललेली) यांचा विवाह २८ जून २०२३ रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात झाला होता. दोघेही परदेशात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. मात्र, लग्नानंतर अवघ्या ११ महिन्यांतच त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले. विचारांमधील तफावत इतकी वाढली की, त्यांनी एकत्र राहण्याऐवजी सन्मानाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
या प्रकरणातील सर्वात वेगळी बाब म्हणजे, ज्या पालकांनी पुढाकार घेऊन हे लग्न जमवले होते, त्यांनाच आपल्या पाल्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पती-पत्नी परदेशात असल्याने त्यांनी आपापल्या आईला 'पॉवर ऑफ ॲटर्नी' (मुखत्यारपत्र) दिले होते. न्यायाधीशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परदेशात असलेल्या पती-पत्नीशी संवाद साधला आणि त्यांचा निर्णय ऐच्छिक असल्याची खात्री करून घेतली.
advertisement
न्यायालयाने का दिला तातडीने निकाल?
हिंदू विवाह कायद्यानुसार, परस्पर संमतीने घटस्फोटासाठी ६ महिन्यांचा 'वेटिंग पिरियड' असतो. मात्र, हे जोडपे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत होते आणि त्यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता उरली नव्हती. त्यांना आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करता यावी, या मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायालयाने ६ महिन्यांचा कालावधी रद्द केला आणि घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केले. ॲड. रोहित एरंडे आणि ॲड. अभिदीप खळदकर यांनी या प्रकरणात कायदेशीर बाजू मांडली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 3:04 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न, दोघं आयटी कंपनीत नोकरीला; पण वर्षभरात झाली अशी अवस्था, कोर्टानंही तात्काळ दिला घटस्फोट








